
बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध कारवाई करून जप्त करण्यात आलेला ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरी करणाऱ्या ट्रक मालकासह दोघांना गुन्हे शाखेच्या युनीट चारने जेरबंद केले. ट्रक मालक मुख्तार मैनुद्दीन काझी (वय 28, रा. पेडगांव, श्रीगोंदा, नगर) आणि त्याचा चालक सुदाम उर्फ सुधीर संपत ढगे (वय 38, रा. पेडगाव, श्रीगोंदा, जि. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वाळू वाहतूक करणारे 9 ट्रक तहसिल प्रशासनाने 2018 मध्ये जप्त केले होते. त्यानंतर संबंधित ट्रकची चोरी करून घोडेगाव परिसरात अवैध वाळू वाहतुकीकरीता वापर होत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांना मिळाली होती. पथकाने सापळा रचून घोडेगाव परिसरात एक ट्रक ताब्यात घेतला. याप्रकरणी चालक ढगे याला पकडल्यानंतर त्याने ट्रकमालक काझी याच्या साथीने ट्रक चोरल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर, उपनिरीक्षक विकास जाधव, शितल शिंदे, फुलसुंदर, आढारी, कराळे, कांबळे यांनी केली.
बेकायदेशरित्या वाळू वाहतूक करणारे ट्रक 2018 मध्ये जप्त करण्यात आले होते. मात्र, जप्त ट्रक चोरून पुन्हा वाळू वाहतूकीसाठी वापरले जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार दोघांना अटक केली आहे.
– जयंत राजूरकर, पोलीस निरीक्षक, युनीट चार





























































