बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक; मुद्देमाल जप्त

टेंभुर्णी येथील बाजारामध्ये बनावट नोटा खपवण्यासाठी आलेल्या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. माढा तालुक्यातील टेंभुर्णी पोलिसांनी सापळा रचून कारवाई करीत आरोपींकडून 48,400 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. ही कारवाई रविवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील पंढरपूर चौकातील उड्डाण पुलाखाली करण्यात आली. लक्ष्मीकांत शंकरआप्पा अळगी (वय 32, रा. अक्कलकोट), सागर मच्छिंद्र बारवकर (वय 34, रा. देऊळगाव, तालुका दौंड) या दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे.

टेंभुर्णी बाजारपेठेत बनावट नोटा खपवण्यासाठी दोनजण येणार असल्याची माहिती टेंभूर्णी पोलीसांना खबऱ्याकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे रविवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे, विलास रणदिवे, पोलीस हवालदार संदीप गिरमकर, पोलीस नाईक विनोद साठे, प्रविण साठे या पथकाने सापळा रचून चारचाकी गाडीतून आलेल्या लक्ष्मीकांत शंकरआप्पा अळगी व सागर मच्छिंद्र बारवकर यांची कसून चौकशी केली असता त्याचेकडे 5 एमए सिरीज असलेल्या 100 रूपयाच्या एकुण 464 आणि 9 बीए सिरीजच्या 100 रूपयांच्या एकुण 20 नोटा अशा एकूण 484 बनावट नोटा आढळल्या. त्याच्यांकडे एकुण 48400 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी या नोटा बाजारपेठ वापरण्यासाठी आणल्याची कबुली दिली. त्यांच्यावर टेंभूर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अजित मोरे करीत आहेत.