
ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्य़ा व्यापाऱ्य़ाकडील 81 लाख रुपयांचे दागिने व 18 लाखांची रोकड लुटणाऱ्य़ा सराईत टोळीतील दोघांना कर्जत येथून आज अटक करण्यात आली. राजगड आणि कर्जत पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. राजगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पाटील, एपीआय प्रमोद पोरे उपस्थित होते.
मारुती राजाराम पिटेकर, आनंता लक्ष्मण धांडे अशी आरोपींची नावे आहेत. कमलेश सुकनराज राठोड यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
कमलेश हे हुबळी ते मुंबई असा ट्रॅव्हल्सने प्रवास करीत होते. त्यांच्याकडे 18 लाख रुपयांची रोकड व 81 लाख 24 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते. प्रवासात शेजारच्या सीटवर तीन आरोपी होते. रात्री कमलेश यांना झोप लागल्याची संधी साधून आरोपींनी ऐवजाची पिशवी चोरली. त्यानंतर बसचालकाला ‘मुलाचा अपघात झाला आहे, गाडी इथेच थांबवा,’ असे सांगत बसमधून उतरून आरोपींनी पळ काढला.
याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे आणि पोलीस नाईक मदने यांनी हुबळीत जाऊन तपास सुरू केला.
तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांना आरोपींचा ठावठिकाणा कर्जत (नगर) आणि कुर्डुवाडी (सोलापूर) या ठिकाणी आढळून आला. त्यानुसार पोलिसांनी पथके पाठवून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून 37 लाख 72 हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पाटील, एपीआय प्रमोद पोरे, एपीआय मनोजकुमार नवसरे, हवालदार खरात, तोडकर, घुले, माने, मदने, जाधव, राजीवडे, लोणकर, मारणे, भोर यांच्या पथकाने कर्जतचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मदतीने ही कारवाई केली.
आरोपी नातलग असून सहाजणांची टोळी काही दिवसांपासून कमलेश यांचा पाठलाग करून रेकी करीत होती. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.– डॉ. अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण
हॉटेलमध्ये राहून व्यापाऱ्य़ांची रेकी
होलसेल सोन्याचे दागिने किकणाऱ्य़ा व्यापाऱ्य़ांची रेकी करून त्यांना लुटले जात होते. संबंधीत सोने विक्री क्यापारी ज्या लॉजमध्ये राहत होते, त्या हॉटेलमध्ये आरोपी खोली आरक्षित करीत होते. त्यानंतर व्यापाऱ्य़ांचा बसमध्ये पाठलाग करून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेउन चोरी करीत होते.
लंगडत आला अन् सीसीटीव्हीत दिसला
आरोपीचा माग काढण्यासाठी राजगड पोलिसांनी शेकडो सीसीटीव्हींचे फुटेज तपासून पाहिले. त्यावेळी एक आरोपी लंगडत चालत असल्याचे अधिकाऱ्य़ांसह कर्मचाऱ्य़ांना दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी खबऱ्य़ांच्या मदतीने आरोपींच्या मुस्क्या आवळल्या.


























































