बुलडाण्यात शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांची हत्या

सामना प्रतिनिधी । बुलडाणा

शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावांची हत्या झाल्याची घटना जळका भंडग भागात शुक्रवारी घडली आहे. या हत्येप्रकरणी पोलिसांनी संध्याकाळी चौघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. खामगाव तालुक्यातील जळका भंडग येथील फोंडे कुटुंबीयांचा धुर्‍यांवरून वाद होता. हा वाद शुक्रवारी पुन्हा उफाळून आला.

मिळालेल्या माहितीनुसार, शेतात काम करीत असताना संतोष मारोती फोंडे (४०) यांच्यावर शेजारच्या शेतातील काही जणांनी हल्ला चढविला. भावावर हल्ला झाल्याचे समजताच त्यांचे भाऊ वामन मारोती फोंडे (३५) मध्यस्थी करायला गेले. मात्र, त्यांच्यावरही हल्लेखोरांनी कुर्‍हाड आणि काठ्यांनी जबर हल्ला केला. त्यामुळे संतोष आणि वामन यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या