
कंत्राटदाराचे देयक मंजूर करून केलेल्या कामाचा धनादेश काढण्यासाठी 15 टक्के कमिशन मागणाऱ्या एपीएमसी मार्केटमधील दोन अधिकाऱ्यांना अॅण्टी करप्शन विभागाने अटक केली आहे. घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता विभागाचे उपसचिव डॉ. दीपक आवटी व प्रभारी निरीक्षक समीर म्हात्रे अशी या लाचखोरांची नावे आहेत.
एपीएमसी मार्केटच्या परिसरात स्वच्छतेचे काम करणाऱ्या ठेकेदाराचे मोठय़ा रकमेचे देयक अनेक महिन्यांपासून पडून होते. ते मंजूर करण्याची विनंती अनेकदा संबंधित ठेकेदाराने उपसचिव डॉ. दीपक आवटी व प्रभारी निरीक्षक समीर म्हात्रे यांच्याकडे केली होती. मात्र त्यासाठी या अधिकाऱ्यांनी 1 लाख 40 हजार रुपयांची मागणी केली. लाच देण्यास नकार देत ठेकेदाराने थेट ‘एसीबी’कडे तक्रार केली. पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एसीबी’च्या विशेष पथकाने आवटी व म्हात्रे यांच्या कार्यालयातच सापळा रचून दोघांना रंगेहाथ पकडले.
पनवेल तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारीही ‘एसीबी’च्या जाळय़ात
पनवेलच्या गावदेवीपाडा येथील जमिनीच्या सातबऱ्यावर नावाची नोंद करण्यासाठी लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यास एसीबीने अटक केली आहे. गोवर्धन माने असे त्याचे नाव असून त्याने 50 हजार रुपये मागितले होते. ‘एसीबी’चे अधिकारी शिवराज पाटील व भागवत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून माने यांना 30 हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडले.


























































