आंध्र प्रदेश मधील खून प्रकरणातील फरार आरोपी मुखेड पोलिसांनी पकडला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुशिल पत्की, मुखेड

आंध्रप्रदेशातील एका खून प्रकरणातील दोन आरोपींना तसेच एका दरोड्यातील आरोपीस अशा तिघांना मुखेड पोलिसांनी आज सकाळी सापळा रचून व त्यांचा पाठलाग करून शिताफीने पकडले. तर, या प्रकरणात आरोपींना मदत करणाऱ्या महिलांनी पोलिसांवर दगडफेक केली.

अनंतपूर जिल्ह्यातील (आंध्रप्रदेश) कल्याण दुर्गम येथील दोन आरोपी शिकारी रवी सिंघाली (४०) व त्याचा सख्खा भाऊ श्रीकांत दुरप्पा शिकारी (२०) हे दोघे डिसेंबर २०१७ मध्ये सख्ख्या चुलत भावाचा खून करून फरार झाले होते. या प्रकरणी बदवेल पोलीस ठाणे यांनी या दोन आरोपींना खून प्रकरणी १७ जुलै २०१८ रोजी अटक करून आंध्रप्रदेश येथील धर्मावरम न्यायालयात हजर करण्यासाठी नेताना ते दोघेही पोलिसांना हिसका देऊन पळून गेले. तेव्हापासून हे दोन्ही आरोपी फरार होते.

आंध्र प्रदेश पोलिसांनी भ्रमणध्वनीच्या लोकेशनद्वारे या आरोपींचा माग काढला असता हे आरोपी महाराष्ट्रातील मुखेड येथे असल्याचे समजले. त्यानंतर आंध्र प्रदेशचे चार पोलीस कर्मचारी मुखेडला आले आणि मुखेड पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली. मुखेड ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी सापळा रचून आरोपी थांबलेल्या ठिकाणी पाहणी केली. या पाहणीत आरोपी त्याच ठिकाणी वास्तव्य करत असल्याचं त्यांना आढळलं. या आरोपींना पोलीस मागावर असल्याची कुणकुण लागताच रविवारी सकाळी साडेसात वाजता त्यांनी कुटुंबासह पळ काढला.

आरोपी फरार होत असल्याची चाहुल लागताच मुखेड आणि आंध्र पोलिसांनी या खून प्रकरणातील आरोपींना पकडलं. या प्रकरणातला तिसरा आरोपी व्यंकटेश साई यालाही पकडण्यात आले. हा एका दरोड्यातील आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनी पोलिसांवर दगडफेक केली. सदरील आरोपी हे अट्टल गुन्हेगार असून, त्यांच्याकडून मोठे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.