
सामना ऑनलाईन । बीड
जिल्ह्यात भयान दुष्काळ पडल्याने शेत शिवार ओस पडले आहेत. जनावरांना चारा नाही. शेतकऱ्यांच्या हाताला काम नाही. यात कर्जाचा डोंगर कसा कमी करायचा चिंतेतून गेवराई तालुक्यातील एका शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली तर बीड तालुक्यातील एका शेतकऱ्याने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले.
परमेश्वर तुळशीराम गाडे (वय 60, रा.गाडेवाडी (कोळवाडी) ता.गेवराई) या शेतकऱ्यावर सावकारासह बँकांचे कर्ज होते. आर्थिक तणावातून या शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात शनिवारी दुपारी अडीच वाजता विष घेतले. त्यांना तत्काळ जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा संध्याकाळी चार वाजता मृत्यू झाला तर बीड तालुक्यातील कांबी येथील शेतकरी राधाकिसन ज्ञानोबा मडके (वय 39) यांनी रविवारी पहाटे तीन वाजता स्वत:च्या घरात दोरीच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. त्यांच्यावर स्टेट बँकेचे दीड लाखाचे कर्ज आहे. या घटनेची माहिती बीड ग्रामीण पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले




























































