
सामना प्रतिनिधी, मुंबई
एका प्रेयसीसाठी दोन मजनू एकमेकांना भिडल्याची घटना दादर येथील गौतमनगर परिसरात घडली. त्यावेळी दोन गटांत झालेल्या तुफान हाणामारीत दोघांना गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून भोईवाडा पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
गौतमनगर परिसरात राहणाऱ्या जॉन आणि त्याच्या चार साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. जॉनचे पिंकी (नाव बदललेले) हिच्याशी प्रेमसंबंध होते. तसेच वरळीत राहणारा निशांत ब्रिजेश सिंग याचेदेखील तिच्याशी सूत जुळले होते. त्यामुळे पिंकीवरून दोघांमध्ये वाद सुरू होता. यापूर्वी त्यांच्यात बाचाबाची झाली होती. मात्र 4 तारखेच्या रात्री निशांत 10 ते 12 जणांना घेऊन गौतमनगरात धडकला. तेथे जॉन आणि निशांतमध्ये मारामारी झाली.
परिसरातील मुलाला मारत असल्याचे बघून गौतमनगरातील तरुण पुढे आले आणि त्यांनी निशांत, त्याचा मित्र रौफ आणि त्यांच्या अन्य साथीदारांना तुफान मारहाण केली. या मारहाणीत निशांत आणि रौफ गंभीर जखमी झाले. एकाच्या डोक्याला दुखापत झाली. दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. दरम्यान, पिंकीसाठी मारामारी करणाऱ्या जॉनसह अन्य चौघांना भोईवाडा पोलिसांनी अटक केल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
summary- two groups fought over a woman


























































