पाथर्डीत पुन्हा एकदा राजळे हटाव नारा

1351

येत्या विधानसभेला कोणालाही उमेदवारी द्या मात्र मोनिका राजळे यांना देऊ नका अशी मागणी एका बैठकीत भाजप कार्यकत्यांनी करत पुन्हा एकदा राजळे हटाव असा नारा दिला आहे. या मागणीसाठी परत एकदा ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट घेण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

भाजप अंतर्गत असलेल्या राजळे विरोधी गटाने सध्या राजळे यांच्या उमेदवारीला विरोध केला असून या विषयावर मागील पंधरवड्यात पंकजा मुंडे यांची भेट घेत राजळे यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी करण्यात आली होती. याच अनुषंगाने पुन्हा एकदा भाजप कार्यकर्ते राहुल कारखेले यांच्या निवासस्थानी पुन्हा एकदा बैठक घेण्यात आली. या बैठकीस  अशोक गर्जे, माजी जी.प. सदस्य  मोहन पालवे,  दिलीप लांडे, नितीन काकडे, बाळासाहेब सोनवणे, माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे,राष्टवादीचे गहीनाथ शिरसाठ, पं. स. चे माजी सभापती संभाजी पालवे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, येळीचे सरपंच संजय बडे,  राहुल कारखेले ,धनंजय बडे, महेंद्र शिरसाठ, दत्तात्रय खेडकर, पाडळीचे सरपंच अशोक गर्जे ,किसण आव्हाड,  राजू नागरे, श्रीधर हंडाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते मात्र याच विषयावर पंकजा मुंडे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला गेलेले माजी जि.प. सदस्य अर्जुन शिरसाठ यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली.

या बैठकीत या मतदारसंघात भाजप वाढवण्यासाठी आम्ही पदरमोड करत भाजपा वाढवली मात्र पक्षाने ऐन वेळी आलेल्या मोनिका राजळे यांना उमेदवारी देऊन आमच्यावर अन्याय केला आहे. राज्यात व केंद्रात भाजपची सत्ता आहे मात्र आम्हाला राजळे यांच्याकडून विरोधी पक्षात असलेल्या कार्यकर्त्यासारखी वागणूक मिळत आहे. आम्ही फक्त सतरंज्या उचलण्याचे काम करायचे का? राजळे या निष्ठावंत असलेल्या भाजप कार्यकर्त्यांशी दुजाभाव करत स्वतःच्या कार्यकर्त्यांना संभाळतात. पक्षश्रेष्ठीनी योग्य उमेदवार दिला तर कमळा सोबत राहू अन्यथा वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा दिला.  तर या बैठकीत अमोल गर्जे यांनी राजळे यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण कोणत्याही परिस्थितीत इतर पक्षाकडून उभे राहू, असा इशारा दिला तर या विषयावर पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांची भेट घेत मोनिका राजळे यांना उमेदवारी देऊ नका, अशी मागणी करण्याचा तसेच  या पुढची बैठक शेवगाव तालुक्यात घेण्याचा निर्णयही बैठकीत जाहीर करण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या