केंद्रातील मोदी सरकारचे सर्व दावे फोल ठरले असून जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यांची मालिका सुरूच आहे. अनंतनाग जिह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये आज जोरदार धुमश्चक्री उडाली असून त्यात दोन जवान शहीद झाले आहेत तर 4 जवान जखमी झाले आहेत. हल्ल्यात दोन स्थानिक रहिवासीही जखमी झाले आहेत. 10 हजार फूट उंचीवर रात्री उशिरापर्यंत ही चकमक सुरू होती.
अनंतनाग जिह्यात कोकेरनागमधील अहलानच्या जंगलात शोधमोहीम सुरू असतानाच दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार सुरू केला. त्याला लष्कराच्या जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. यादरम्यान सहा जवान जखमी झाले. त्यातील दोन जवानांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.
आठ महिन्यांत सहा दहशतवादी हल्ले
जम्मू-कश्मीरमधील दहशतवादी हल्ले रोखण्यात केंद्रातील भाजपचे सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. गेल्या 78 दिवसांत कश्मीरात 11 दहशतवादी हल्ले झाले असून गेल्या तीन वर्षांत 47 जवान शहीद झाले आहेत. यात या वर्षी आतापर्यंत सहा मोठे हल्ले झाले असून त्यात कॅप्टन, हवाईदलाचा एक अधिकारी आणि 10 जवान शहीद झाले.