सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
रत्नागिरी शहरात सुरु असलेल्या गांजा विक्री विरोधात पोलिसांनी कठोर पावले उचलत कोम्बिंग ऑपरेशन करत शहरातील राहूल कॉलनी परीसरात दोन किलो १५ मिली ग्रॅम गांजा पकडला आहे. गांजा विक्री करणाऱ्या पाच जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. एकूण ४६ हजार २८६ किलो किमंतीचा गांजा पकडला.
रत्नागिरी शहरात राहूल कॉलनी, बेलबाग,उद्यमनगर परिसरात खुलेआम गांजा विक्री होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे गुरूवारी रात्री राहूल कॉलनी परिसरात गांजा पकडला. राहूल कॉलनीत नूरजहॉं आसिफ़ मिरजकर वय ४७ रा. राहूल कॉलनी, यांचा मुलगा नजफ मिरजकर वय २७ हा गांजा विक्री करताना आढळला. याठिकाणी जुबेर हुसेन शेखासन वय ३८ का. साळवी स्टॉप, रेहान रियाज काळसेकर वय ३८ रा.साळवी स्टॉप, सर्फराज अहमद शहा वय २९ रा.गवळीवाडा असे तिघे गांजा खरेदी करताना आढळले. त्यांच्याकडून ७७ मिली ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. त्यानंतर व्हीक्टर या श्वानाच्या माध्यमातून शोध घेऊन झडती घेण्यात आली आहे. नूरजहॉं आसिफ़ मिरजकर यांच्या घरात २ किलो १५ मिलीग्रॅम गांजा सापडला, अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक मितेश गट्टे, शहर पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, वाहतूक निरीक्षक अनिल विभूते उपस्थित होते. या करवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्रीमती ढाकणे यांचाही सहभाग होता.
चिपळूण आणि खेड मध्येही कारवाई करणार
अंमली पदार्थाच्या आहारी शाळकरी मुले जात अाहेत. अमंली पदार्थाच्या विळख्यातून तरुण पिढीला बाहेर काढणे गरजेचे आहे. याप्रकरणाचा खोलवर तपास करत असून परजिल्ह्यातून बस मधूनही मोठ्या प्रमाणात गांजा आणला जातो, अशी माहिती मिळाली असून त्यदृष्टीने उपाययोजना करत आहोत. तसेच नागरिकांनी अशा प्रकारचे काही आढळल्यास पोलिसांशी संपर्क करावा, असे सागंताना रत्नागिरीप्रमाणेच चिपळूण आणि खेड तालुक्यात कारवाई येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांनी सांगितले.
































































