दळवीनगर झोपडपट्टीत आगीत होरपळून दोघांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पिंपरी

झोपडीला आग लागल्यानंतर सिलिंडरमधून गॅसगळती होऊन झालेल्या स्फोटात एका तृतीयपंथीयासह दोघांचा होरपळून मृत्यू झाला, तर ८ झोपड्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. ही घटना आज पहाटे चिंचवड येथील दळवीनगर झोपडपट्टीत घडली. अग्निशमन दलाने ४ बंबांच्या साहाय्याने अध्र्या तासात आग आटोक्यात आणली.

शंकर तात्याबा क्षीरसागर (वय ३५, रा. झोपडपट्टी, चिंचवड) आणि प्रदीप प्रकाश मोटे (वय ३०, रा. वाल्हेकरवाडी) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. चिंचवड पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी याबाबत माहिती दिली. मृतांपैकी शंकर क्षीरसागर हे तृतीयपंथी होते. प्रदीप मोटे हे विवाहित होते. प्रदीप यांचे क्षीरसागर यांच्याकडे सतत जाणे-येणे होते. त्यांच्यात नेहमी वादही होत असत. बुधवारी रात्रीही ते क्षीरसागर यांच्या घरी आले होते. गुरुवारी पहाटे पावणेचारच्या सुमारास त्यांच्या झोपडीला अचानक आग लागली. आग लागल्यानंतर काही वेळातच झोपडीतील एका सिंलिंडरमधून गॅसगळती झाली. त्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. यात बाजूच्या झोपड्यांनीही पेट घेतला.

अग्निश्मन दलाला आगीची वर्दी मिळताच ४ बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अध्र्या तासात आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मोटे आणि क्षीरसागर या दोघांचा होरपळून मृत्यू झाला होता. या आगीत झोपडीतील इतर २ सिलिंडरमधूनही गॅसगळती झाल्याचे उघडकीस आले. त्यामुळे आग जास्त भडकली. सुदैवाने बाजूच्या रहिवाशांनी घराबाहेर पळ काढल्याने ते बचावले. आगीत या झोपडीशेजारील अनंता जिजाराम वाघमारे, राजाबाई म्हसा जाधव, हरी सदाशिव मनोहर, शंकर शांताराम राऊत यांच्या झोपड्यांसह ७ ते ८ झोपड्याही जळून खाक झाल्या.