कराड येथील अपघातात दोन ठार एक जखमी

कराड-चांदोली रस्त्यावर तुळसण पुलावर बांधकाम सुरू असलेल्या पुलावरुन दुचाकी खाली कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातात दोन ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्रीच्या वेळेस दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करताना ही घटना घडली.

जानु भैरु झोरे, कोंडिबा भागोजी पाटने अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत, तर दगडू बिरू झोरे हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. तिघेही रा. भेंडवडे ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर (मूळ रा. चांदोली वसाहत) येथील असून जखमींवर कराड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, कराड-चांदोली मार्गावर ओंड-उंडाळे (ता. कराड) दरम्यान असलेल्या तुळसण पुलाचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला होता. मात्र, रविवारी रात्रीच्या सुमारास या पुलावरून दुचाकीस्वार ट्रिपल सीट प्रवास करताना हा भीषण अपघात झाला.

सदर पुलाचे बांधकाम सुरू असल्याने तो वाहतुकीसाठी बंद करून पुलाच्या बाजूने वाहतुकीस मार्ग तयार करण्यात आला आहे; परंतु रात्रीच्या वेळेस दुचाकी भरधाव वेगात असल्याने बॅरिकेड्स तोडून ती पुलावरून खाली कोसळली. या अपघातात दुचाकीवरून ट्रीपल सीट प्रवास करीत होते. जखमीला उपचारासाठी कराड येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, मृतदेह पुलाच्या बांधकामातील सळ्यांमध्ये अडकले होते. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. अपघातात दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली असून याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या