किनवट तालुक्यात दोन बिबट्यांचे मृतदेह आढळले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठवाड्यातील किनवट तालुक्यातील तल्हारी झळकवाडी जंगलालगत असलेल्या पुंजाजी महादू झळके यांच्या शेतात दोन बिबट्यांचे मृतदेह आढळल्यने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेथे धाव घेऊन शवविच्छेदन करून बिबट्यांचा अंत्यविधी केला आहे.

मराठवाड्यात किनवट आणि माहूर तालुक्यांतील घनदाट जंगल आहे. या तालुक्यातील तल्हारी व झळकवाडी या जंगलालगत असलेल्या पुंजाजी महादू झळके यांच्या शेतात जवळ जवळच दोन बिबट्यांचे मृतदेह आढळून आले. गावातील व्यक्तींनी वन विभाग आणि किनवट वन विकास महामंडळाच्या कार्यालयाला ही माहिती दिली. त्यानंतर नांदेडचे वन विभागाचे उपवनसंरक्षक आशिष ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. बिबट्यांची पूर्ण पाहणी तज्ज्ञ मंडळींकडून व पक्ष मित्रांकडून करण्यात आली. या मृतदेहांवर विष प्रयोग झाला का किंवा त्यांना औषध देऊन मारण्यात आले याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. या दोन्ही मृतदेहांचा आज पंचनामा करण्यात आला. त्यावेळी पशुविकास अधिकारी व्ही.एल.बिराजदार, पशूवैद्यकीय अधिकारी अजय शिवणकर, ओमप्रकाश शिंदे, एन.एस.मिराशे यांनी हे शवविच्छेदन केले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही बिबट्यांचे अंत्यसंस्कार केले. वन विकास महामंडळाचे सहायक व्यवस्थापक जे.डी.पराड, इस्लापूर व परिसराचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.के.शिंदे व अन्य वनरक्षकांच्या मार्फत या बाबत सखोल चौकशी केली जात आहे. एका मागे एक अशा दोन बिबट्यांचे मृतदेह याठिकाणी आढळल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे.