
सामना प्रतिनिधी, लातूर
आंबेडकर जयंतीच्या कार्यक्रमात अधिक वेळ नाचू दिले नाही म्हणून दोघांना चाकूने भोसकण्यात आल्याची घटना औसा तालुक्यातील मौजे आलमला येथे घडली. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आलमला येथील विश्वनाथ चंद्रकांत मस्के याने या प्रकरणी तक्रार दाखल केली. 30 एप्रिल रोजी आलमला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. जयंती मिरवणूक गावातील मारुतीच्या मंदिराजवळ आली असता मिरवणूकीतील सुरज शांतप्पा वाघमारे, नितेश शांतप्पा वाघमारे यांनी मिरवणूकीसमोर नाचण्याच्या कारणावरून फिर्यादीसोबत वादावादी केली होती. मिरवणूक संपल्यानंतर फिर्यादी हा त्याच्या घरी गेला. त्यानंतर रात्री 9.30 च्या सुमारास सुरज शांतप्पा वाघमारे, नितेश शांतप्पा वाघमारे, अमर वाघमारे, प्रफुल्ल भालेराव, शेरसिंग भालेराव, दिलीप गायकवाड, रोहित गायकवाड आणि इतर तिघे फिर्यादीच्या घरात आले. अमर वाघमारे याने फिर्यादीस चाकूने भोसकले, काठीने, कोयत्याने मारहाण केली.
फिर्यादीचा भाऊ नवनाथ, जयश्री सचिन लांडगे, विनायक दगडू लांडगे हे सोडवण्यासाठी आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. फिर्यादीचा भाऊ नवनाथ याला दिलीप याने चाकूने मारले. या प्रकरणी औसा पोलीस ठाण्यात 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



























































