
ऐन गर्दीच्यावेळी लोकल फलाटावरून लवकरात लवकर सुटावी, मोटरमनला प्रत्येक नव्या फेरीला आपली जागा गाठण्यासाठी तंगडतोड करावी लागू नये यासाठी लोकलच्या दोन्ही दिशांना मोटरमन तैनात करण्याचा प्रस्ताव आहे. पश्चिम रेल्वेने आपल्या पंधरा डबा लोकलमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यावर विचार सुरू केला आहे. मात्र यामुळे गार्डच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता असून मोटरमनची अधिक पदे भरावी लागणार आहेत.
मुंबई उपनगरीय मार्गावर धावणाऱया लोकल ट्रेनचे ऑपरेशन सुरळीत राहण्यासाठी दोन्ही दिशांना मोटरमन असावेत असा प्रस्ताव आहे. मोटरमनकडून अनेकदा लाल सिग्नल ओलांडणे अर्थात ‘सिग्नल पास अॅट डेंजर’ तर कधी फलाट सोडून लोकल पुढे नेणे म्हणजे ‘प्लॅटफॉर्म ओव्हर शूटिंग’ करण्याचे गंभीर प्रकार घडतात. त्यामुळे मोटरमनचे जागच्या जागी निलंबन केले जाते. व चौकशीतून सुटेपर्यंत त्यांना लोकल चालविता येत नाही. त्यामुळे आधीच मोटरमनची संख्या कमी असल्याने इतर मोटरमनवर ताण येतो. त्यामुळे सहायक महाव्यवस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली एक ‘स्पॅड कमिटी’ नेमली होती.
पश्चिम रेल्वेला 670 ठिकाणी फायदा
अंधेरी, बोरिवली आणि विरारमध्ये मोटरमन व गार्डच्या क्रुचे ओव्हरलॅपिंग टाळले जाईल, टर्मिनसवरून लोकलचा उलट दिशेने नवा प्रवास सुरू करताना मोटरमनला जागा बदलावी लागते. प्लॅटफॉर्मला लोकल लागल्यानंतर मोटरमनची 8 ते 2 मिनिटे या प्रक्रियेत वाया जातात. दोन्ही दिशांना मोटरमन तैनात केल्याने पश्चिम रेल्वेच्या 670 ठिकाणी अशा मोटरमन व गार्डच्या अदलाबदलीचा वेळ वाचेल तसेच फलाट लवकर मोकळा झाल्याने तो अधिक लोकलच्या नियोजनासाठी वापरता येईल. नव्या पद्धतीने लोकल दुसऱया बाजूने अवघ्या दोन मिनिटांत सुरू करता येतील, रिव्हर्सलचा वाचलेला एक मिनिटदेखील प्रवाशांना अतिरिक्त लोकल सुविधा उपलब्ध करण्यात महत्त्वाचा ठरेल असे समितीचे म्हणणे आहे.































































