
गिर्यारोहण करताना डोंगरावरून पडून अमोल वाघ आणि मयूर म्हस्के (रा. नगर) या दोन तरुण गिर्यारोहकांचा मृत्यू झाल्याची घटना कातरवाडी भागात घडली. याप्रकरणी चांदवड पोलीस स्थानकात आकस्मित मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे.
नगर येथील इंद्रप्रस्थ गिर्यारोहण ग्रुपच्या 15 जणांची टीम मनमाडपासून जवळ असलेल्या कातरवाडी भागातील शेंडीच्या डोंगरावर गिर्यारोहण करण्यासाठी आली होती. त्यात 8 मुली आणि 7 मुलांचा समावेश होता. हे सर्वजण डोंगरावर गेले. प्रारंभी गिर्यारोहक अमोल वाघ आणि मयूर म्हस्के हे खिळे ठोकत दोर बांधून डोंगराच्या शेंडीवर गेले. त्यानंतर इतर 13 जण वर आले. सायंकाळी 13 जण खाली उतरले. शेवटी अमोल वाघ आणि मयूर म्हस्के खाली येत असताना खिळा निखळल्यामुळे दोर सटकून दोघे खाली पडले. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला.


























































