
जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. यात तरुणाच्या डोक्याला गंभीर इजा झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 17) सकाळी 9 ते 11.30 वाजण्याच्या सुमारास पिंपरीतील बौद्धनगर येथे घडली. अनिल बीरेंदर राम (वय 25, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गौतम दीपक कदम आणि त्याच्या एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनिल आणि आरोपी यांचे मागील काही दिवसांपूर्वी अनेक वेळा भांडण झाले आहे. त्या भांडणाच्या रागातून आरोपीने तक्रारदारांना धक्का देत भांडणाला सुरुवात केली. त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केले. यात तक्रारदार गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.



























































