
सामना ऑनलाईन । बगदाद
विमान हजारो फुटांवर असताना दोन पायलटमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना बगदादमध्ये उघडकीस आली आहे. हजारो फुटांवर ज्यांच्या भरवशावर विमानात बसलोय त्यांच्यातच जुंपल्याने प्रवाशांची धाकधूक चांगलीच वाढली होती. दरम्यान, या प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेऊन दोन्ही वैमानिकांना इराकी एअरवेजने निलंबित केले आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, इराकी एअरवेजचे हे विमान तब्बल ३७ हजार फुटांवर असताना दोन वैमानिकांमध्ये जुंपली होती. या विमानात १५७ प्रवासी होते. विशेष म्हणजे विमान सुरक्षित लँड झाल्यानंतरही दोन्ही वैमानिक भांडत होते.
याबाबत एका सहवैमानिकानं इराकी एअरवेजच्या व्यवस्थापनाला पत्र लिहिले आहे. ‘एअर हॉस्टेस माझ्यासाठी जेवण आणत होती. मात्र वैमानिकानं तिला जेवणाचा ट्रे आणू दिला नाही. त्यामुळे वैमानिकासोबतचा वाद वाढला. वैमानिकाने तिला जेवण आणण्याची परवानगी नाकारल्याने हा संपूर्ण प्रकार घडला,’ असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
तसेच ‘जेवण झाल्यावर वैमानिकानं मला धक्का दिला आणि माझा अपमान केला, त्यानंतर मी त्याला प्रत्युत्तर दिलं. कारण मला स्वत:चं रक्षण करायचं होते’, असेही सहवैमानिकाने पत्रात म्हटले आहे. यानंतर दोघांमध्ये हाणामारी झाली. विमान सुरक्षितरित्या बगदादमध्ये पोहोचलं. मात्र लँडिंगनंतरही वैमानिकांमधील भांडण सुरूच होते.
Summery – Iraqi Airways suspends pilots for fighting in cockpit at 37,000 ft



























































