स्वस्तात सोनं देण्याचे आमिष दाखवून पोलिसांनीच व्यापाऱ्याला लुटलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । वाशिम

पुण्यातील एका व्यापाऱ्याला स्वस्तात सोनं मिळवून देण्याचे आमिष दाखवून दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी लूटल्याचा प्रकार घडला आहे. मुकेश गौरखेडे (35) आणि कैलास राठोड (40) असे या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. या प्रकरणी वाशिम पोलीस अधीक्षकांनी दोन पोलिसांवर बडतर्फीची कारवाई केली आहे.

पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील व्यापारी रणजीत गायकवाड यांना आरोपींनी कमी किमतीत 3.5 किलो सोने देण्याचे बतावणी केली. गायकवाड यांना आपल्या जाळ्यात फसवून सोने घेण्यासाठी त्यांना यवतमाळमधील उमरखेड येथे बोलाविण्यात आले. ठरल्याप्रमाणे गायकवाड 12 लाख रुपये घेऊन उमरखेडच्या दिशेने येत असताना रस्त्यातच त्यांना अडवून त्यांच्याकडील 12 लाख रुपये घेऊन आरोपींनी पळ काढला. या प्रकरणी गायकवाड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

उमरखेड पोलिसांनी या प्रकारणी तपास केला असता आरोपी मुकेश गौरखेडे हा मंगरुळपीर पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई असल्याचे उघड झाले. या दोघांशिवाय त्यांच्या आणखी एका साथीदाराला अटक केली असून त्यांना न्यायालयाने 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत वाशिमचे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी यांनी पोलीस दलातील दोन्ही आरोपी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी सेवेतून बडतर्फ केले आहे.