प्रवासादरम्यान रिक्षाचालकाला मारहाण करून रिक्षा चोरली, दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ससाणेनगरला जायचे सांगून रिक्षात बसलेल्या प्रवाशांनी रिक्षा चालकाला जीवे मारण्याची धमकी देत त्याची रिक्षा पळवून नेणाऱ्या दोघांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडली.

विशाल दिलीप करपते (वय 21 ) आणि विकी गोपाल बुरघाटे (वय 25 दोघेही रा. हांडेवाडी रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी कुणाल अग्रवाल (वय २१, रा. लक्ष्मीनगर, येरवडा ) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास विशाल आणि विकी प्रवाशी म्हणून कुणाल यांच्या रिक्षामध्ये बसले. त्यांनी रिक्षाचालक कुणालला हडपसरमधील ससाणेनगरमध्ये जायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार ते दोघांना रिक्षातून घेउन चालले होते. त्यावेळी मुंढवा परिसरात आरोपींनी कुणालला रिक्षा थांबविण्यास सांगितली. त्यानंतर रिक्षा चालकाला दगडाने मारहाण करण्याची भीती घालून 80 हजारांची रिक्षा चोरून नेली. त्यानंतर कुणालने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करीत आहेत.