
पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून चौघांनी दोघा भावडांवर शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना काल सकाळी सव्वा नउ वाजण्याच्या सुमारास पुणे जिल्ह्यातील आंबेगाव खुर्दमधील गगनगिरी हिल्स परिसरात घडली.
भुजंग हेंद्रे (वय 27) आणि राजूभाऊ हेंद्रे अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चौघांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी नउ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी भुजंग आणि त्यांचे भाउ राजूभाऊ दुचाकीवरुन त्यांच्या दुकानात चालले होते. त्यावेळी गगनगिरी हिल्स परिसरात आलेल्या चौघांनी भुजंग यांची दुचाकी अडविली.
पूर्वीच्या तक्रारीचा राग मनामध्ये धरून चौघांनी आमच्याविरोधात तक्रार देता काय, अशी विचारणा करीत त्यांच्यावर वार करुन जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक ए. आर. कवठेकर तपास करीत आहेत.




























































