खदानीत बुडून दोन शाळकरी मुलासह शेतकऱ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिलीप मीरटकर । आखाडा बाळापूर

कळमनुरी तालुक्यातील कवडी शिवारात दोन शाळकरी मुलांसह त्यांना वाचविण्यासाठी गेलेल्या पन्‍नास वर्षीय शेतकर्‍याचा खदानीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी साडे चारच्या सुमारास घडली. या घटनेमुळे कवडी गावावर शोककळा पसरली आहे.

कळमनुरी तालुक्यातील कवडी येथील सुखदेव सुभाष राऊत (१५ वर्ष) , संभाजी प्रकाश पतंगे (१४ वर्ष) व विशाल बनसोडे (१५ वर्ष) हे शेवाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. बुधवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर गावाकडे जात असतांना कवडी शिवारातील गावानजीक असलेल्या गायरान जमिनीमधील मुरूमासाठी खोदकाम केलेल्या खदानीत तिघेही पोहण्यासाठी उतरले. त्यांच्यासोबत इतरही शाळकरी मुलेही होते. खदानीत आठ ते दहा फुट खोल पाणी असल्यामुळे मुलांना पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते बुडू लागले. यातील विशाल बनसोडे याने आरडा ओरड केल्यानंतर शेजारी गुरे चारणारे शेतकरी दत्‍तराव नामदेव पतंगे (५० वर्ष) यांनी तत्काळ खदानीकडे धाव घेवून मुलांना वाचविण्याचा प्रयत्न केला. तिघांपैकी विशाल बनसोडे यास खदानीबाहेर काढून दत्‍तराव यांनी इतर दोघांना वाचविण्यासाठी खदानीत उडी घेतली. जीवाच्या आकांताने खदानीतील दोन्ही मुलांनी दत्‍तराव यांना पकडल्यामुळे तिघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.

या घटने दरम्यान, पतंगे नावाचे शिक्षक कवडीकडे जात असतांना हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्यंकट केंद्रे यांना माहिती दिली. केंद्रे यांनी तत्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत चिंचोलकर, जमादार संजय मार्के, गजानन मुटकुळे, संतोष नागरगोजे, प्रशांत शिंदे, राजेश मुलगीर, शेख अर्शद, राजू जाधव यांना सोबत घेत घटनास्थळी धाव घेतली. तिघांनाही खदानी बाहेर काढून पोलीसांच्या वाहनांमध्ये आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तिघांनाही तपासून मृत घोषित केल्याने नातेवाईकांनी एकच टाहो फोडला. यातील विशाल बनसोडे यास वाचविण्यात यश आले.

या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे पंचायत समिती गटनेते गोपु पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे पाटील, शेवाळ्याचे सरपंच अभय सावंत यांनी ग्रामीण रूग्णालयात भेट देवून मयताच्या नातेवाईकांना धीर दिला. या घटनेची माहिती मिळताच कवडी, शेवाळा, आखाडा बाळापूरातील आठशे ते हजारांवर नागरिकांनी ग्रामीण रूग्णालयात गर्दी केली होती. या घटनेमुळे कवडी गावावर शोककळा पसरली. उशिरा मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचे सुरू होते. कवडी शिवारातील गायरान जमिनी लगत अवैधरित्या खोदकाम करून मुरूम खोदल्यामुळे तेथे मोठी खदान पडली. या खदानीत आठ ते दहा फुट पाणी साचले. खदानीमुळेच विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला. शाळकरी मुलांना वाचविण्यासाठी देवदूत म्हणून आलेल्या शेतकर्‍यालाही मृत्यूनेही कवटाळल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्‍त केली जात आहे.