मुखेडमध्ये खड्ड्यातील पाण्यात पडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

355

राष्ट्रीय महामार्गाच्या पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पडून दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी दुपारी मुखेड तालुक्यातील जांबजवळ ही घटना घडली. जांब येथील जि.प. प्राथमिक शाळेत शिकणारे ज्ञानोबा अशोक हुलगुडवाड ( वय 12, रा. नायगाव, ह.मु. जांब, इयत्ता 7 वी) आणि माधव अंतेश्वर सगर ( वय 11, रा. शिरूर अनंतपाळ, ह.मु. जांब, इयत्ता 5 वी) हे दोन विद्यार्थी सकाळच्या सत्रात शाळेला जाऊन दुपारची सुटी असल्याने पायी शेताकडे निघाले होते.

सध्या नांदेड-दिग्रस-जांब-उदगीर या राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. जांबजवळील एका छोट्याशा नाल्यावर पूल बांधण्यासाठी रस्त्यावर मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. या खड्ड्यात संबंधित ठेकेदाराने पाणी साचविले आहे. ही दोन्ही मुले त्या रस्त्याने शेताकडे पायी जात असताना पाय घसरून त्या खड्ड्यात पडली. दोन्ही मुले पाण्यात बुडत असल्याचे रस्त्याने जाणाऱ्या काही महिलांना दिसले. त्यांनी आरडाओरड केली असता बाजूचे शेतकरी राजू देशमुख यांनी तात्काळ त्या खड्ड्यात उतरून दोन्ही मुलांना वर काढले. मात्र तोपर्यंत त्या मुलांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही मुलांना वडील नसून ते आईसोबत मामाकडे आजोळी जांब येथे राहत होते. माधव अंतेश्वर सगर हा एकुलता एक होता. त्यामुळे सगर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या