
जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत ‘लष्कर-ए-तोयबा’च्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दोन्ही दहशतवादी ‘लष्कर’चे टॉप ऑपरेटिव्ह होते. जाकीर अहमद गनी आणि लतीफ भट अशी या दहशतवाद्यांची नावे असून त्यांचा, गेल्या वर्षी पहलगाम हल्ल्यानंतर तयार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या हिट लिस्टमध्ये समावेश होता.
सुरक्षा दलांना शुक्रवारी शोपियानमधील सैदपुरा पायीन भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. लष्कराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन दहशतवादी मीमंदर भागात दिसले होते. त्यानंतर परिसराची नाकाबंदी करून शोधमोहीम हाती घेण्यात आली. सुरक्षा दलांचे जवान जवळ पोहोचताच दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर तेथे मोठी चकमक उडाली. शनिवारी सायंकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास चकमक सुरू झाली, मात्र अंधारामुळे मोहीम रात्री थांबवण्यात आली होती. त्यानंतर सकाळी पुन्हा मोहीम सुरू करून दोन्ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
14 दहशतवाद्यांच्या हिटलिस्टमध्ये समावेश
जाकीर अहमद हा कुलगाम जिल्ह्यातील मुतलहम गावाचा रहिवासी होता. तो २०२४ मध्ये तर लतीफ हा गेल्या वर्षीच ‘लष्कर’मध्ये सामील झाला होता. पहलगाम येथील हल्ल्यानंतर १४ दहशतवाद्यांची हिट लिस्ट सुरक्षा दलांनी तयार केली होती. त्यात त्याचे आणि लतीफचे नाव होते. या यादीतील ९ दहशतवाद्यांचा आतापर्यंत खात्मा करण्यात आला आहे.






























































