आधी मोटारसायकली चोरायचे, मग स्वस्त किंमतीत विकायचे; दोन चोरट्यांना अटक

मोटारसायकल चोरी करुन स्वस्त किंमतीत विकणाऱ्या दोन चोरट्यांना जामखेड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून चोरी केलेल्या 10 लाख 35 हजार रुपये किंमतीच्या 36 मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. वैभव बाबासाहेब खेडकर आणि सुधीर शहाजी सुरवसे अशी अटक आरोपींची नावे आहेत.

जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल कुलदीप घोळवे, पो. कॉ. भगीरथ देशमाने हे 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास बस स्थानक परिसरात पेट्रोलिंग करत असताना आरोपी वैभव बाबासाहेब खेडकर हा संशयितरित्या बिगर नंबर प्लेट मोटारसायकलवर फिरत होता. यावेळी त्याच्याकडे मोटारसायकल कागदपत्रांची चौकशी केली असता समाधानकारक उत्तर देता आले नाही. यावेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन जामखेड पोलीस स्टेशनला आणले. मोटारसायकलबाबत चौकशी केली असता त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. आपला मित्र सुजित सुरवसेसह आपण मोटारसायकल चोरी करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

दारू आणि चैन करण्यासाठी पैशाची गरज भागविण्यासाठी जामखेड, श्रीगोंदा, कर्जत, संभाजीनगर, पुणे, अहमदनगर, धाराशिव, लातूर, बीड या जिल्ह्यातून गर्दीच्या ठिकाणाहून मोटारसायकली चोरी केल्याचे त्याने सांगितले.

चोरलेल्या मोटारसायकली नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांना स्वस्त दरात विकायचे. यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करत त्यांच्याकडून चोरी केलेल्या 36 मोटारसायकली हस्तगत केल्या. पोलीस आरोपींची सखोल चौकशी करत आहेत. ज्यांच्या मोटारसायकली चोरीला गेलेल्या आहेत त्यांनी जामखेड पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केले आहे.