
एसटी महामंडळाने काळाची पावले ओळखत आपल्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यासाठी हालचाली चालू केल्या आहेत. सध्या एसटी महामंडळात दीडशे इलेक्ट्रिक बसेसकरिता टेंडर प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे भविष्यात दोन हजार इलेक्ट्रिक बसेसचा समावेश करण्यात येणार आहे. या दीडशे बसेसचे वेळापत्रकही तयार करण्यात आले असून त्या 300 कि.मी.च्या मार्गांवर संभाजीनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, नागपूर विभागामार्फत चालविण्यात येणार आहेत.
एसटी महामंडळाने प्रदूषण कमी करण्यासाठी ‘लिक्विफाइड नॅचरल गॅस’ अर्थात ‘एलएनजी’ वर बसेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात पाचशे बसेसना ‘एलएनजी’चे कीट बसविण्यात येणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच एसटी महामंडळ प्रथमच पाचशे साध्या बसेस भाडय़ाने घेणार असून त्याचेही टेंडर काढण्यात आले आहे. त्यातच हवेचे आणि ध्वनीचे प्रदूषण कमी करण्यासाठी 150 इलेक्ट्रिक बसेससाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या बसेसना ज्या मार्गावर भारमान जास्त आहे तेथे चालविण्याची योजना आहे. या विद्युत बसेसचा किमान वाहन वापर 400 कि.मी. अपेक्षित असून 300 कि.मी. झाल्यावर विद्युत बस चार्जिंग करावी लागणार आहे. यासाठी संभाजीनगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर या ठिकाणी चार्जिंग स्थानके उभारण्याची प्रक्रिया सुरू असून उर्वरित विभागात नवीन चार्जिंग स्थानक उभारावे लागणार आहे.
300 कि.मी.च्या मार्गांवर धावणार…
विद्युत बसेसकरिता परवाना तसेच रस्ते कर व टोलशुल्क, उच्चदाबाची विद्युत वाहिनी आगारापर्यंत आणून देण्याचा खर्च व इतर खर्च महामंडळाला करावा लागणार आहे. बसेसची व चार्जरची मालकी बस पुरवठादाराची राहणार आहे. या बसेसना महामंडळाने वाहक पुरवायचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बसेस मुंबई ते पुणे घाटमार्ग असल्याने गैरसोयीच्या असून त्या पुणे ते कोल्हापूर, संभाजीनगर, नागपूर आणि नाशिक अशा शहरांसाठी चालविण्यात येणार आहेत.

























































