ऐन सहामाही परीक्षेच्या तोंडावर मुंबई महापालिका प्राथमिक शाळांतील तब्बल दोन हजार शिक्षकांना बीएलओच्या कामांना जुंपले आहे. त्यामुळे या शाळांमधील पहिली ते चौथीचे विद्यार्थी वाऱ्यावर आहेत. वर्गात शिक्षक नसल्याने विद्यार्थ्याच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे.
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करता वर्गात शिक्षक उपस्थित असणे आवश्यक आहे. शाळा सुरू होऊन अजून तीन महिनेदेखील पूर्ण झालेले नाहीत. तरीही या शिक्षकांना वर्गावरून काढून बीएलओ कामांना पाठविण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून शिक्षकाशिवाय सहामाही परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण होईल का, असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.
मुंबई महापालिका शिक्षक सेनेने याप्रकरणी मुंबई महापालिका शिक्षण अधिकारी राजेश कंकाल यांच्याकडे तक्रार केली असून पहिली ते चौथीच्या शिक्षकांना लावण्यात आलेली बीएलओची कामे तातडीने रद्द करून या शिक्षकांना वर्गात परतण्याच्या सूचना देण्याची मागणी शिक्षक सेनेने केली आहे.
आरटीई कायद्यातील कलम 27 नुसार शिक्षकांना जनगणना आणि आपत्कालीन परिस्थितीमधील कामाशिवाय इतर कोणतेही अशैक्षणिक कामे देऊ नये, असे म्हटले आहे. तरीदेखील महापालिका शिक्षकांना बीएलओ कामांना जुंपण्यात आल्याने पालिका शिक्षक सेनेचे अध्यक्ष के. पी. नाईक यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे.