
सोने खरेदीच्या बहाण्याने ज्वेलर्समधून हातचलाखीने दागिने चोरीसह विविध गुन्हे करणऱ्या दोन आंतरराज्य महिला चोरट्यांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुचित्रा किशोर साळुंखे (वय 50 रा. केशवनगर, मुंढवा ) आणि कोमल विनोद राठोड (वय 45 रा अप्पर इंदीरानगर) अशी अटक केलेल्या महिला चोरट्यांची नावे आहेत.
महिलांनी हातचलाखीने 18 सप्टेंबरला शामगिरी ज्वेलर्समधून सोनसाखळी चोरून नेली होती. सीसीटीव्ही फुटेजचे माध्यमातून तपास केला असता, पोलीस कर्मचारी मितेश चोरमोल व अभिनय चौधरी यांना सुचित्रा आणि कोमल यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली अशिष गायकवाड, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, रसाळ यांनी महिलांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गोवा, वॉस्को, हैद्राबाद पंजगुटा, फलटण आणि कात्रज परिसरात चोऱ्या केल्याची कबुली दिली.
चोरलेल्या वस्तु अश्वीन सोळंकी (वय 42, रा. येरवडा) यांना विकल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहीरट, उपनिरीक्षक नितीन शिंदे, रविंद्र चिप्पा, गणेश भोसले, मंगेश पवार, अवधुत जमदाडे, आशिष गायकवाड, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, विक्रम सांवत यांनी केली.
जेष्ठ महिलेची सोनसाखळी चोरली
कात्रज बसस्थानकातून जेष्ठ महिलेची सोनसाखळी महिलांनी चोरून नेली होती. पोलिसांनी सोनसाखळी जप्त केली आहे. त्याशिवाय आणखी तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी सांगितले.
























































