
शिस्तबद्ध पक्ष म्हणून टेंभा मिरवणाऱ्या भाजपमध्ये पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत वाद उफाळून आला आहे. प्रभाग क्रमांक 22मध्ये भाजपच्या एकाच पॅनलमधील दोन महिला उमेदवारांमध्ये रविवारी रात्री पक्षाच्या बैठकीदरम्यान जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोन्ही बाजूंचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि धराधरी झाली. हे प्रकरण थेट खडक पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन पोलीस स्टेशनच्या उंबरठय़ावर थांबवून पक्षाकडे वळवले.
रविवारी प्रचार संपल्यानंतर भाजपची अंतर्गत बैठक पार पडली. या वेळी एका महिला उमेदवाराच्या भावाने दुसऱया महिला उमेदवारावर मागील निवडणुकीत काम न केल्याचा संदर्भ देत गद्दारीचा टोमणा मारत आरोप केले. मागील निवडणुकीत जसा दगा दिला तसे या निवडणुकीत करू नका, असा टोमणा मारल्याने दुसऱया महिला उमेदवाराच्या पतीचा पारा चढला. त्यानंतर वातावरण तापले आणि त्यातूनच वादाची ठिणगी पडली. एकाच पॅनलमध्ये राहून ‘क्रॉस व्होटिंग’ टाळण्याबाबत चर्चा सुरू असताना जुन्या जखमा उघड झाल्या. यानंतर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक चकमक होऊन ती हातघाईपर्यंत गेली. रात्री उशिरापर्यंत हा वाद मिटण्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती.
अखेर दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी खडक पोलीस ठाणे गाठत एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणुकीच्या तोंडावर पोलीस ठाण्याच्या दारातून हा वाद पक्षाकडे नेल्याची चर्चा होती. वरिष्ठ पातळीवर विषय मांडण्याचे आश्वासन देत कार्यकर्त्यांना शांत करण्यात आले आणि तक्रार दाखल होण्याआधीच प्रकरण थांबवण्यात आले.






























































