
जम्मू–कश्मीरच्या किश्तवाड जिह्यातील छत्रू भागात रविवारी हिंदुस्थानी जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार केले. या मोहिमेत मुख्य हिरो ठरला एक चार पायांचा शूर योद्धा आर्मी डॉग टायसन!
घनदाट जंगल, बर्फाच्छादित डोंगर आणि खडकाळ रस्त्यांत लपलेले दहशतवादी शोधण्यासाठी सेना, जम्मू-कश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी संयुक्त कारवाई केली. नैदगाम-वाणीपुरा परिसरात जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी एका तात्पुरत्या झोपडीत दडले आहेत, अशी माहिती मिळाली. या वेळी टायसन श्वान पुढे सरसावला. पॅरा स्पेशल फोर्सेसचा हा प्रशिक्षित जर्मन शेफर्ड कुत्रा शांतपणे पुढे गेला. शत्रूच्या लपण्याच्या जागेजवळ पोहोचताच त्याने हालचालींद्वारे सैनिकांना संकेत दिले. दहशतवादी घाबरले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. पहिलीच गोळी टायसनच्या पायाला लागली. रक्त येऊ लागले, दुखापत झाली, पण टायसन थांबला नाही. तो खचला नाही. पुढे सरकत राहिला आणि दहशतवाद्यांचे नेमके ठिकाण पक्के केले. त्यानंतर जवानांनी एकदम वेगाने कारवाई केली. रॉकेट आणि गोळीबाराने झोपडी उद्ध्वस्त केली. मोठय़ा स्फोटानंतर तीन दहशतवाद्यांचे मृतदेह सापडले. त्यात जैश-ए-मोहम्मदचा कमांडर सैफुल्लाहा होता. त्याच्यावर 10 लाख रुपयांचे इनाम होते.
टायसनला ताबडतोब उधमपूरच्या आर्मी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या कामगिरीबद्दल टायसनचे कौतुक होत आहे.





























































