
उबर ऍपमध्ये ओएनडीसी (ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स)चे एकत्रीकरण यशस्वी झाले आहे. त्यामुळे आता मेट्रोचे तिकीट थेट उबरवरून काढता येणार आहे. या ऍपद्वारे मेट्रोचे तिकीट बुक करणाऱ्या प्रवाशांना तब्बल 50 टक्क्यांची म्हणजेच 10 रुपयांपर्यंतची सूट मिळणार असल्याची माहिती महामुंबई मेट्रोने त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर प्रसिद्ध केली आहे. सध्या ही सुविधा मेट्रो लाईन 2 ए व 7 साठी उपलब्ध करण्यात आल्याने दहिसर-अंधेरी व डीएननगर मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 मार्गावरून दररोज साडेतीन लाख प्रवासी प्रवास करतात. मेट्रो लाइन 2 ए दहिसर पूर्व ते डीएन नगरदरम्यान धावते, तर मेट्रो 7 दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व या मार्गावर धावते. या लाखो प्रवाशांपैकी 70 टक्के प्रवासी ऑनलाईन तिकीट बुक करत असून त्यासाठी ते मुंबई वन ऍप, व्हॉटस्ऍप किंवा एनसीएमसी कार्डचा वापर करतात. मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओएनडीसीच्या माध्यमातून उबरसोबत या लोकाभिमुख डिजिटल एकीकरणाची घोषणा केल्याने या प्रवाशांसाठी आता आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. यापूर्वी केवळ वर्सोवा-घाटकोपर मार्ग म्हणजेच मेट्रो 1 साठी उबरद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा उपलब्ध झाली होती. परंतु आता उबरद्वारे तिकीट मेट्रो 1, मेट्रो 2 ए आणि मेट्रो 7 या तीनही मार्गांवरील प्रवाशांसाठी ही सुविधा उपलब्ध झाली आहे. लवकरच ही सेवा मेट्रो लाइन 9 आणि मेट्रो 2 बीवरसुद्धा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती महामुंबई मेट्रो प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक जलद, स्मार्ट आणि सुलभ होणार आहे.
लवकरच सेवेचा विस्तार
सध्या मेट्रोपासून प्रवाशांची लास्ट माइल कनेक्टिव्हिटी सुधारण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे उबरसारख्या एकाच ऍपवर प्रवाशांना मेट्रो तिकिटांसह रिक्षा, कॅब बुक करून पुढील प्रवासाचं नियोजन करता येणार आहे. शिवाय मेट्रो प्रवाशांसाठी बेस्ट बससेवा, पादचारी पूल आणि स्थानकांजवळ पार्किंगची सुविधा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती महामुंबई मेट्रोने दिली आहे.
आधीपासून सेवा उपलब्ध
मुंबई मेट्रो तिकीट बुकिंगसाठी यात्री, इक्सिगो, नवी, ईएमटी, टम्मॉक, ट्रिपोझो, वन तिकीट, ऑटोपे, मॅजिकपिन, चलो, रेडबस, हायवे डिलाइट आणि पेलोकल यासारख्या ओएनडीसी -सक्षम ऍपवर तिकीट बुकिंग सेवा आधीपासून उपलब्ध आहे. यामध्ये आता उबरचाही समावेश झाला आहे. यामुळे प्रवाशांसाठी विविध डिजिटल पर्याय उपलब्ध झाले असून त्या सोयीनुसार आवडता पर्याय निवडता येणार आहे.


























































