
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
उदय सामंत आणि बाळ माने एकत्र येऊ नयेत म्हणून अनेकजण देव पाण्यात ठेऊन बसले होते. मात्र आता सर्जिकल स्ट्राईकचा जमाना आहे त्यामुळे आता आपण एकत्र येऊन सर्जिकल स्ट्राईक करूच. गेल्या साडेचार वर्षात शिवसेना आणि भाजपने स्वतंत्र निवडणुका लढवल्या. त्यामुळे आता गाव पातळींवर आणि गटस्तरावर महायुतीच्या बैठका घेऊन महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊया, असे आवाहन भाजपचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी रत्नागिरी शहरातील महायुतीच्या प्रचारात केले.
महायुतीच्या प्रचार सभेला महायुतीचे उमेदवार विनायक राऊत,शिवसेना उपनेते, म्हाडा अध्यक्ष उदय सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने, जिल्हा सरचिटणीस अशोक मयेकर, सह जिल्हासंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, भाजप तालुकाध्यक्ष सतीश शेवडे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, महिला जिल्हा संपर्कप्रमुख वर्षा पितळे, लोकसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख नेहा माने, महिला जिल्हा संघटक वेदा फडके भाजप माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, भाजप नेते ॲड.दीपक पटवर्धन, शहर अध्यक्ष प्रशांत डिंगणकर, शिवसेना विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, शिवसेना शहरप्रमुख बिपिन बंदरकर, महिला जिल्हा समनव्यक शिल्पा सुर्वे, महिला शहर संघटक मनीषा बामणे, भाजप महिला शहराध्यक्ष रश्मी कदम व इतर पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी सांगितले की, पाण्यावर दुश्मनाने काठी मारली की पाणी काही काळ लांब जातं पण पुन्हा ते एकत्र येतं, अशी शिवसेना-भाजप युती आहे. देशाच्या हिताचा, देशाच्या संरक्षणाचा सर्वोच्च विचार घेऊन आज शिवसेना-भाजप एकत्र आली असून पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना देशाचे पंतप्रधान बनवायाचं महायुतीचे स्वप्न साकार करूया. रत्नागिरी शहरात गेल्या पाच वर्षात अनेक विकास कामे झाली आहेत. नळपाणी योजना, भुयारी गटार योजना, भुयारी विद्युतवाहिनी, बगीचे, रस्ते, माळनाका येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे तारांगण, अॅक्टीव्हीटी सेंटर अशी अनेक विकासकामे शिवसेना-भाजप युतीने केली आहेत, असे राऊत यांनी सांगितले.

































































