‘मी काय संन्यास घेणार नाय एवढंच सांगतो’, उदयनराजे यांच्याकडून निवडणूक लढण्याचे संकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
udayanraje-bhosale

लोकसभेच्या महासंग्रामाचे बिगुल वाजले तरी महायुतीने सातारच्या उमेदवारीचा विषय लटकवून ठेवल्याने भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या गोटात संतापाचे वातावरण आहे. त्यातच आज, ‘मी काय संन्यास घेणार नाय एवढंच सांगतो,’ अशी स्पष्ट प्रतिक्रिया देत उदयनराजे यांनी निवडणूक लढवणार असल्याचेच संकेत दिले.

उदयनराजे यांना लोकांमधून निवडून येऊन संसदेत जायचे आहे. तशी इच्छा त्यांनी पक्ष नेतृत्वाकडे बोलून दाखवली होती आणि गेले काही दिवस लोकसभा लढवण्याच्या दृष्टीने मोर्चेबांधणीही सुरू केली होती. परंतु भाजपकडून त्यांना उमेदवारीसाठी झुलवत ठेवले गेले आहे. त्यामुळे त्यांच्या गोटात अस्वस्थता वाढत गेली. मतांसाठी महाराष्ट्रात उठता बसता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेणाऱया भाजपकडूनच अशा पद्धतीची वागणूक मिळू लागल्यामुळे उदयनराजे समर्थक आक्रमक झाले आहेत. भाजपच्या दुसऱया उमेदवारी यादीतही नाव न आल्याने त्यांचा संताप उफाळून आला व सामूहिक राजीनामे देण्याचा पवित्राही त्यांनी घेतला. परंतु भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी समजूत काढल्याने उदयनराजे समर्थक तूर्ततरी शांत आहेत.