दीड महिन्यानंतर सरकारमध्ये बसलेले गद्दार बेकार होणार. पण त्यांना आम्ही रोजगार देणार नाही. एकाही गद्दाराला रोजगार देणार नाही. शिवसेना रोजगार देते. तर मिंधे-भाजप कॉण्ट्रक्टर मित्रांचे खिसे भरायला फक्त मोठमोठ्या प्रकल्पांची भूमिपूजन-उद्घाटने करताहेत.
निवडणुका जिंकण्यासाठी हजारो-लाखो कोटींच्या मोठमोठ्या प्रकल्पांच्या घोषणा करायच्या. मात्र नोकऱ्यांचा पत्ता नाही अशी स्थिती मिंधे-भाजपने महाराष्ट्रात करून ठेवली आहे. नुसत्या घोषणांनी लोकांची पोटं भरत नाहीत, असा टोला लगावत गद्दारी करून सरकार स्थापन झाल्यानंतर एकतरी प्रकल्प सुरू केला का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मिंधे-भाजप सरकारला केला.
गद्दारीने राज्यात निर्माण झालेल्या अस्थिरतेमुळे आता कुणीही गुंतवणूकदार राज्यात यायला तयार नाही. तुम्ही फक्त प्रकल्पाच्या नावाखाली महाराष्ट्र लुटताहात. मात्र मोदीजी तुम्ही कितीही फिती कापा, पण लक्षात ठेवा… एका महिन्यात आमचं सरकार येणार. त्यावेळी तुमच्या महाराष्ट्र लुटीचा हिशेब मांडणार, असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी आज केला.
राज्यात नोकरी मिळत नसल्यामुळे बेरोजगारीचे भीषण वास्तव असताना शिवसेनेच्या वतीने विलेपार्ले येथे ‘महा नोकरी मेळावा’ आयोजित करून हजारो तरुणांना ‘ऑन द स्पॉट’ नोकरी देण्यात आली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना मिंधे-भाजपच्या कारभाराचे वाभाडेच काढले.
महाविकास आघाडी सरकार असताना सामंजस्य करार करून येणारे प्रकल्प मिंध्यांच्या गद्दारीमुळे आले नसल्याचा टोलाही त्यांनी लगावला. मात्र आता लक्षात ठेवा की, विधानसभा निवडणुकीला एक-दीड महिनाच राहिला आहे. मोदीजी, आपणही येताहात. पण हव्या तेवढ्या फितीही कापा, जनता तुम्हाला आणि तुमच्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेच्या माध्यमातून काम होत असल्यामुळे आपल्याला बोलायची गरज नाही. शिवसेनेच्या माध्यमातून आपण बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार देत आहोत.
मिंधे-भाजप सरकारमुळे राज्यात बेरोजगारीची भीषण स्थिती निर्माण झाली आहे. लोकसंख्या वाढतेय, मात्र रोजगार वाढत नाहीत. कुणीही नोकरी द्यायला तयार नाही. 17 हजार पोलीस पदांसाठी 17 लाख उमेदवारांचे अर्ज. सफाई कामगार पदासाठी 46 हजार अर्ज आले. अशी भीषण स्थिती आहे.
आपण इतरांना नोकऱ्या देऊ शकलो पाहिजे!
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवतीर्थावरती मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या भूमिपुत्राच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. नोकऱ्या तर मिळाल्या पाहिजेतच, मात्र बाळासाहेबांची शिकवण आहे नोकऱ्या घेणारे होऊ नका, नोकऱ्या देणारे व्हा. इतर कंपन्यांमध्ये नोकऱ्या तर घेऊच, मात्र काही उद्योग असे सुरू करा की आपण इतरांना रोजगार देऊ शकलो पाहिजे. 1966 ते आज 2024. या सगळ्या काळात इतर पक्षांनी आपल्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी काय केलं? आणि शिवसेनेने काय केलं? हे मोजायचं झालं तर शिवसेनेचं कर्तृत्व हे फार मोठं आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. हिंदुत्व आणि हिंदुत्वामधलं फरक.
निवडणुका जिंकण्यासाठी दंगली भडकवताहेत
आजचं राजकारण निवडणुका जिंकण्यासाठी चाललंय. दंगली भडकवण्यासाठी राजकारण सुरू आहे, हिंदू-मुसलमान दंगल कर, समाजा-समाजात तेढ वाढव, हे का करायचं? त्यात मारले जातात सामान्य माणसं, पकडले जातात सामान्य माणसं, पण त्यांच्यामागे पोलिसांचा ससेमिरा लागतो. कोर्टाच्या तारीख पे तारीख लागतात आणि त्या दंगलींचं भांडवल करून सत्ताधारी सत्ता मिळवतात. अशा वातावरणात नोकऱ्यांसाठी किंवा रोजगारासाठी सरकारच नव्हे तर शिवसेनेखेरीज कोणता पक्ष काम करतोय, हे जसं आज आम्ही सांगतोय तसं त्यांनी येऊन सांगावं, असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं.
आमचे हिंदुत्व घरातली चूल पेटवणारे आहे, मात्र यांचे हिंदुत्व घरे पेटवणारे आहे, हा फरक असल्यामुळे यांना शिवसेना संपवायची आहे!
मराठी माणसाला अडवणारा दरवाजा जागेवर राहणार नाही
मागच्या काळात काही ठिकाणी मराठी माणसांना त्या उद्योगाच्या ठिकाणी प्रवेश नाही, अशा जाहिराती झळकवण्यात आल्या. मात्र शिवसेना मराठी माणसाला अडवणारा दरवाजा तोडून फोडून टाकेल. मराठी माणसाला अडवणारा दरवाजा जागेवर राहणार नाही, असा इशारा देतानाच प्रत्येक राज्यात भूमिपुत्रांचा बाणा राखलाच गेला पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
मिंधे-भाजपकडून मात्र केवळ मतांसाठी ‘मुलगी शिकली, पंधराशे देऊन घरी बसवली’ असा खेळ सुरू आहे. मात्र आम्ही तसे होऊ देणार नाही. शिवसेना न्याय्य हक्कांसाठी लढत राहणार, असा विश्वास व्यक्त करतानाच आम्ही घेतलेला ‘वसा’ पूर्ण करण्यासाठी तुमचा आशीर्वाद द्या, असे आवाहन त्यांनी केले.
उद्घाटने होतात, मग प्रकल्प कुठे जातात?
अरबी समुद्रातील स्मारकाच्या जलपूजनाच्या कार्यक्रमाचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्या स्मारकाचे काय झाले? मिंधे-भाजपच्या कॉण्ट्रक्टर मित्रांचे, पदाधिकाऱ्यांचे खिसे भरण्याचे काम फक्त सध्या सुरू आहे. एकीकडे पंतप्रधान अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करताहेत. पंतप्रधान येतात त्यांच्या कॉण्ट्रक्टर मित्रांचे खिसे भरायला. हजार कोटींचा प्रकल्प, एक लाख कोटींचा प्रकल्प अशी भूमिपूजन, उद्घाटने केली जातात, मात्र प्रकल्प सुरू होत नाहीत. मग हे पैसे जातात तरी कुठे, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.