
हिंदुस्थानींचे रक्त सांडणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट खेळण्याची परवानगी देणाऱया मोदी सरकारला व त्यांच्या भाजपला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अक्षरशः झोडपून काढले. ‘पाकिस्तानी प्रशिक्षक बोलावला म्हणून देशासाठी गोल्ड मेडल जिंकणाऱया नीरज चोप्राला तुमच्या गधड्या अंधभक्तांनी देशद्रोही ठरवले. मग उद्याचा सामना बघणाऱया जय शहाला आणि तुमच्या इतर आंडूपांडू लोकांनाही देशद्रोही ठरवणार का,’ असा भेदक सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज केला.
अबुधाबी येथे रविवारी हिंदुस्थान-पाकिस्तानचा क्रिकेट सामना होत आहे. या सामन्याला देशभरातून विरोध होत आहे. या विरोधाचा आवाज बुलंद करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मोदी व भाजपच्या दुटप्पीपणाचा बुरखा टराटरा फाडला. ‘पहलगाम हल्ला झाल्यानंतर आता पाकिस्तानला आपण शिल्लकच ठेवणार नाही अशा वल्गना केल्या गेल्या. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले गेले, पण काही दिवसांतच सगळे शांत झाले. त्याचे उत्तर मागितले तेव्हा ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून सुरूच आहे असे सरकारने सांगितले. मग ज्यांच्याशी युद्ध पुकारलं आहे, त्यांच्याशीच क्रिकेट खेळायला निघालो आहोत, असं अचानक काय झालं,’ असा बिनतोड सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
गुपचूप केक कापणाऱ्यांनी शिकवू नये!
मियाँदाद आणि बाळासाहेबांच्या भेटीचा दाखला देऊन शिवसेनेवर टीका करणाऱया मुख्यमंत्री फडणवीस यांचाही त्यांनी समाचार घेतला. ‘हे मुख्यमंत्री तेव्हा नव्हते, त्यामुळे मी त्यांच्या बोलण्याला किंमत देत नाही. ज्यांचे नेते नवाझ शरीफच्या वाढदिवसाचा केक गुपचूप खाऊन येतात आणि जीनाच्या थडग्यावर डोकं ठेवून येतात त्यांनी आम्हाला देशभक्ती शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
भाजपवाले नावं चांगली ठेवतात!
भाजपच्या प्रचारतंत्राची उद्धव ठाकरे यांनी यावेळी खिल्ली उडवली. ‘भाजपवाले नावं चांगली ठेवतात. ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन महादेव… आता उद्याच्या सामन्याला यांनी काय नाव ठेवलंय माहीत नाही. ‘हर घर सिंदूर’ ही मोहीम ते राबवणार होते, पण टीका झाल्यामुळे ती गुंडाळली. आता प्रत्येक घरातून त्यांना सिंदूर पाठवला पाहिजे. तेच आम्ही करणार आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठीत दांडिया आणि सिंदूर थीम
दहशतवादी हल्ल्यातील पीडित भगिनींचा आक्रोश अद्याप थांबलेला नाही आणि भाजपवाले निर्लज्जपणे देशभक्तीच्या नावाने सिंदूर वाटप करतायत. दांडिया खेळतायत. विक्रोळीत भाजपने मराठी दांडिया आयोजित केलाय. त्यात सिंदूर ही थीम ठेवलीय. उद्या हिंदुस्थान-पाकिस्तानच्या सामन्यात ते दांडियाची जाहिरातही दाखवतील. ते इतके निर्लज्ज आहेत की काहीही करू शकतात, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
क्रिकेटपटूंवर दबाव आहे!
सामन्याविरोधात क्रिकेटपटू बोलत नाहीत याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता उद्धव ठाकरे म्हणाले, ‘हरभजन सिंग व सौरव गांगुली बोलले आहेत. शेवटी क्रिकेटच्या नाडय़ा जय शहाच्या हातात आहेत. क्रिकेटपटूंनी काही विरोधात बोललं तर त्यांना घरी पाठवलं जाऊ शकतं. खरी परीक्षा जय शहा, अमित शहा आणि मोदींची परीक्षा आहे. त्यांना पैसा प्रिय आहे की देश हे त्यांनी ठरवायचं आहे.’
क्रिकेटमधील विकेट आणि हौतात्म्याची तुलना चुकीची
विकेट किती गेल्या हे महत्त्वाचे नाही, अंतिम निकाल महत्त्वाचा असतो असे एका अधिकाऱयाने ‘ऑपरेशन सिंदूर’विषयी बोलताना म्हटले होते. त्यावरही उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ‘सैनिकांच्या हौतात्म्याची तुलना क्रिकेटमधील विकेटशी करणाऱयांच्या अकलेची कीव येते. विकेट गेली तर दुसऱया सामन्यात तो खेळाडू खेळू शकतो, पण शहीद झालेला सैनिक परत येत नाही हे ज्यांना कळत नाही त्यांना काय सांगणार? यांना केवळ व्यापार करायचा आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अजूनही वेळ गेलेली नाही!
‘एखाद्या खेळावर बहिष्कार टाकला म्हणजे काही लगेच जागतिक संकट ओढवत नाही. याआधीही असं अनेकदा झालेलं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. जगभरात शिष्टमंडळं पाठवून जे सरकारला साध्य करता आलं नाही, ते हा एक सामना थांबवून साध्य करता येऊ शकतं. आम्ही दहशतवादाविरोधात आहोत, पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवणार नाही हा ठाम संदेश आपण जगाला देऊ शकतो. मोदींनी हे दमदारपणे सांगायला हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेनाप्रमुखांनी मियाँदादला ठणकावलं होतं!
पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत क्रिकेट नाही अशी भूमिका हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. जावेद मियाँदाद जेव्हा मुंबईत आला होता तेव्हा बाळासाहेबांनी त्याला हेच सांगितलं होतं. पाकिस्तान जोपर्यंत आमच्या देशाशी नीट वागत नाही तोपर्यंत आम्ही क्रिकेट होऊ देणार नाही, हा फालतूपणा बंद करा, असं त्यांनी ठणकावलं होतं, याची आठवण उद्धव ठाकरे यांनी करून दिली.
देशभक्तीचा व्यापार सुरू आहे!
‘पाकिस्तानशी क्रिकेट खेळून देशभक्तीची थट्टा केली जात आहे. केवळ थट्टाच नाही तर सरकारने देशभक्तीचा व्यापार सुरू केला आहे. व्यापारापुढे या सरकारला देशाचीही किंमत राहिलेली नाही, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी चढवला. पहलगाममध्ये हिंदुस्थानी नागरिकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या. पंतप्रधानांच्या लेखी देशाला आणि हिंदुत्वाला काही किंमत आहे की नाही? देशापेक्षा व हिंदुत्वापेक्षा त्यांना व्यापार महत्त्वाचा आहे का याचे उत्तर त्यांनी द्यावे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.