भाजपवाल्यांनी सांगावं, ते मराठीसाठी किती वेळा रस्त्यावर उतरले? उद्धव ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमालय मोठा चालू आहे, थंड डोक्याने सह्याद्रीचा वापर करून घेतो आणि मग सह्याद्रीला लाथा घालतो असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. तसेच भाजपवाल्यांनी सांगावं, ते मराठीसाठी किती वेळा रस्त्यावर उतरले? असा घणाघातही उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाच्या वतीने ‘मराठीचा जागर’ हा कायक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज आपल्या मातृभाषेचा मराठी भाषा दिन आहे. दिन म्हणायचं म्हणजे तो एकच दिवस असतो. पण आपण सगळेजण अस्सल मराठी बोलणारे, मराठी आईची मुलं आहोत. त्यामुळे आपल्यासाठी रोजच मराठी भाषा दिन असलाच पाहिजे. मराठी भाषा दिन किंवा मराठी भाषा ही असलीच पाहिजे.

एक अप्रतिम कार्यक्रम आपण आज अनुभवला. जादूची पेटी आपल्या आयुष्यात मतपेटी आहे. राजकारण्यांच्या थापा आपण रोजच बघतोय. पण ढोलकीवरील थाप आता विरळ होत चालली आहे. त्यामुळे मी मंदार ओक आणि प्रभू तुम्हाला खास करून धन्यवाद देतो आणि तुमच्या सहकाऱ्यांनाही खूप धन्यवाद देतो की शब्दावाचून काय काय कळू शकतं. म्हणजे ते म्हणतात ना शब्दावाचून कळले सारे. हीच तर किमया, हीच तर जादू आहे. म्हणजे शब्दाला सूर लाभले तर काय होऊ शकतं? शब्द दंगलसुद्धा घडवू शकतात आणि शब्द मंगलकार्यसुद्धा करू शकतात. असे हे शब्द आणि सूर यांचं नातं आहे.

आणि पेटी म्हटल्यानंतर मला ती पेटी काही नवीन नाही. कारण माझे काका श्रीकांतजी त्यांना मी लहानपणापासून पाहत आलो आहे. पेटी घेऊन बसायचे. त्यांच्या समोर त्या वेळचे सगळे दिग्गज कलाकार यायचे. शोभा गुर्टू यायच्या. बरेच मोठमोठे गायक-गायिका घरी यायचे. आणि विशेष म्हणजे त्यांनी मोहम्मद रफींकडून मराठी गाणं गाऊन घेतलं. ते मराठी गाणं मोहम्मद रफींना उच्चार नीट कळावेत म्हणून त्यांनी उर्दूमध्ये लिहून दिलं होतं. काकांना उर्दू सुद्धा अप्रतिम लिहिता-वाचता यायची. हे मी का सांगतोय? कारण कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष करत नाही. पण आमच्यावर जबरदस्ती करू नका. एवढीच आमची जोपर्यंत ऐकताय तोपर्यंत नम्र विनंती.

दीपक पवार, तुम्ही म्हणालात की माझा राग आला तरी चालेल. हल्ली मला पवारांचा राग येत नाही. पण तुम्ही मराठीसाठी बोलता. आणि शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी लढणारी संघटना म्हणून झाला. त्यामुळे मराठीसाठी आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो. आता मुख्यमंत्री त्याचं क्रेडिट घेत आहेत दोन बंधूंना आम्ही एकत्र आणलं.

आताच्या काळात विंदा करंदीकरांची एक कविता आहे. त्यातल्या दोन ओळी आहेत —

“लढवून बांधवांना संहार साधणारा,
गीता खुशाल सांगे इलाज काय त्याला.”

आधी भांडवायचं, भांडण लावायचं, संवाद घडवायचा. आणि मग गीता सांगायची. उपयोग काय त्याचा? बरं, जसं आम्हाला दोघांना भावाने एकत्र आणलं, तसं आता तुम्ही तिकडे पण काही एकत्रीकरण करता का? ज्या सध्या काही बातम्या चालू आहेत. विलीन होणार, विलीन होणार लोक वाट बघतायत. तर तसं काही विलिनीकरण करतात का? नाहीतर उगाच फुकटच्या गोष्टी कशाला? कशाला नसल्या गोष्टींचं श्रेय घेताय?

मला एका गोष्टीचा समाधान आहे म्हटलं तर अभिमान आहे, आणि अभिमान नक्कीच आहे की मी मुख्यमंत्री असताना राज्यात मराठी भाषा सक्तीची केली. पण त्याचबरोबर एका गोष्टीचं वैषम्यही आहे, आणि खेदही आहे, की महाराष्ट्रात मराठी सक्तीची करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. सक्ती कशाला पाहिजे? महाराष्ट्र म्हटलं की मराठी असलीच पाहिजे.

आता काल-परवाच बातम्यांमध्ये आलं हिंदीची सक्ती. समिती नेमली होती. त्यांनी अहवाल दिला. अहवाल हातात घेतला. अहवाल हातात घेतला म्हणजे शब्दशः पाहिलं तर स्वीकारला. पण तो स्वीकारल्यानंतर अंमलबजावणी करायची की नाही, यासाठी जी समिती नेमली होती तिची बैठकच झाली नाही. कारण त्यासाठी तुम्ही सूरत-गुवाहाटी अशी यात्रा काढली. सरकार पाडलं. त्या समितीची बैठकच झाली नाही. बरं, तो निर्णय आम्ही घेतला म्हणून तुम्ही लादणार होतात, तर असे अनेक निर्णय होते ते का रद्द केले नाहीत? मराठी भाषा भवन अजून उभंच राहत नाही. आपण जादूची पेटी पाहिली, तशीच आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र आणि बंगाल या दोघांना रंगभूमीची पार्श्वभूमी आहे. नाटक, रंगभूमी इथे चौपाटीवर मी मराठी रंगभूमीच्या वाटचालीचं दालन उभारणार होतो. रद्द करून टाकलं. बिल्डरांच्या घशात घातलं का तो निर्णय? काय लांबवलं?

मराठी भाषा भवन अजून पडून आहे. पण भाजपचं कार्यालय उभं राहतं. कुठल्यातरी बातमीमध्ये आलं होतं सगळे भूखंड झाकून तुम्ही तुमच्या पक्षाची कार्यालयं उभी करता. पण माझ्या मातृभाषेचं भवन उभारायला तुम्हाला मुहूर्त शोधावा लागतोय? कसले मुख्यमंत्री? कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री?

एक गोष्ट नक्की आहे महाराष्ट्राला एका प्रादेशिक पक्षाची गरज आहेच. आणि ती शिवसेना आहेच. मराठी माणसाची एक वृत्ती आहे तो आधी स्वतःचा स्वार्थ पाहत नाही. दुसऱ्याच्या मदतीला धावून जातो. हा गुण आहे की दोष, अजून कळलेलं नाही. दरवेळी काही झालं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री जातो. हिमालय मोठा चालू आहे डोक्यावर बर्फ आहेच थंड डोक्याने सह्याद्रीचा वापर करून घेतो. आपलं इच्छित साध्य करून घेतो. आणि मग सह्याद्रीला लाथा घालतो. देशावरती कोणताही घाला असेल पहिला महाराष्ट्र पुढे जातो. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतो. त्यांच्यापासूनचा आपला इतिहास आहे. बाकीच्यांसारखं नाही की स्वतःचं ठेवलं झाकून आणि दुसऱ्याचं पाहिलं वाकून. आपल्याकडे तानाजी होता “आधी लगीन कोंढाण्याच.” दुसऱ्यावर संकट आलं की त्याला मदत करणं हा महाराष्ट्राचा संस्कार आहे. आता तो संस्कार जर कोणी दोष म्हणून वापरत असेल, तर ते आपलं दुर्दैव आहे. पण आज परत गरज आहे. जसं बंगालमध्ये ममता उभ्या राहिल्या संपूर्ण बंगाल त्यांच्या मागे उभा राहतो. एका महिलेच्या मागे उभा राहतो. हिमत होत नाही तिकडे नजर टाकायला. सरळ ईडी घुसते, फाईल येते, काय करता जा! तामिळनाडूतही तेच आहे.

आम्हाला भाषेचा अभिमान आहे पण देश, हिंदुस्थान आमचाच आहे. भाषावार प्रांतरचना झाली. प्रत्येक भाषेला राज्य मिळालं. राजधानी मिळाली. आम्हाला आमचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात आम्हाला सुखाने राहू द्या. तुम्ही तुमच्या घरात मोठे व्हा. आम्ही कुठे काही म्हणतोय? आमच्या घरात आलात तर सोबत रहा. आम्ही नाही म्हणत नाही. पण घरावर मालकी सांगायला लागलात जसं गद्दार गेले आणि माझ्या पक्षावर मालकी सांगायला लागले तर मग सहन कसं करायचं?

भाजपची एक नीती आहे पहिल्यांदा प्रादेशिक संस्कृती मारून टाकायची, भाषा मारून टाकायची, संस्कार मारून टाकायचे. आणि मग “वन नेशन, वन इलेक्शन.” म्हणजे एक नेता, एक दिशा, एक प्रधान. आपल्या वाटेला चांगलं एक निशाण पाहिजे तो तिरंगा पाहिजे. भाजपचा झेंडा नको. आम्हाला तिरंगा पाहिजे माझ्या भारत मातेचा, आपल्या देशाचा तिरंगा. तो आम्ही ध्वज मानतो.

एक संविधान आणि एक प्रधान म्हणजे देशातून निवडून गेलेला प्रधान आम्ही मानतो. तोच सगळं नाही. आणि आता मला भीती वाटायला लागली आहे की उद्या “जन गण मन” सुद्धा मारतील की काय? कारण त्यात पंजाब, सिंध, गुजरात, मराठा प्रत्येक प्रांताचा उल्लेख आहे. अभिमानाने उल्लेख आहे. हे आपलं राष्ट्रगीत आहे. प्रादेशिक अस्मिता मारून टाकायच्या? सगळं हिंदीकरण करायचं?

आता तुम्ही पेटीवरती गाणी ऐकलीत. कितीतरी गाणी हिंदी आहेत. महाराष्ट्राने ती डोक्यावर घेतली नाहीत का? अजरामर केली नाहीत का? लता मंगेशकर, आशा ताई, मंगेशकर घराणं मराठीच ना? त्यांनी दिलेल्या चालींमुळे ती गाणी जगभर गाजली. अगदी सूर जरी ऐकले तरी कळतं हे गाणं आहे. एवढी लोकप्रियता महाराष्ट्राने दिली. मग सगळं काही चांगलं चाललं असताना दुधात साखर टाकायला नसेल तर मीठ टाकू नका.

सगळे पक्ष खतम करायचे म्हणून यांना शिवसेना नको आहे. कारण शिवसेना आहे. आणि ती तुम्हाला पुरून उरणार आहे. त्याची चिंता करू नका. कारण त्यांना माहिती आहे शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्रात मराठी माणूस ताठ मानेने उभा राहू शकतो.

जे आम्हाला प्रश्न विचारतात शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? या ना पाहायला. स्थानी लोकाधिकार समितीने काय केलं? अरविंद सावंत तिकडे बसलेत भारतीय कामगार सेनेने काय केलं? जर शिवसेना नसती, स्थानी लोकाधिकार समिती नसती, भारतीय कामगार सेना नसती तर मराठी माणसाची अवस्था त्याच्या घरात काय झाली असती? जे प्रश्न विचारतात त्यांना विचारा अरे गधड्या, तू मराठी माणसासाठी एकदा तरी रस्त्यावर उतरला आहेस का? शिवसेनेला यावर्षी 60 वर्षे पूर्ण होतील. अजूनही आम्ही आमचा झेंडा सोडलेला नाही. नेता आमचा एकच आहे. दैवत एकच आहे. भाषा एकच आहे. आम्ही अदलाबदल करणारे नाही.

सातत्याने 60 वर्षे मराठीसाठी लढणारी शिवसेना आहे. भाजपवाल्यांनी सांगावं, ते मराठीसाठी किती वेळा रस्त्यावर उतरले? महाराष्ट्रात जमिनी बळकावण्यासाठी त्यांचे मित्र प्रयत्न करतात त्यांच्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरवता. पण मराठीसाठी किती वेळा उतरला? चला होऊन जाऊ द्या. आम्ही सांगतो काय केलं. भाजपने सांगावं त्यांनी काय केलं. आमचा स्वभाव दोष ठरत चाललाय दुसऱ्यासाठी धावून जाण्याचा. पण म्हणून शिवसेना 80 टक्के समाजसेवा, 20 टक्के राजकारण या तत्वावर उभी राहिली. रक्तदान असो, अपघात असो, घातपात असो अॅम्ब्युलन्स घेऊन धावणारा शिवसैनिक असतो.

आज मराठी भाषा दिन आहे. नुसतं मराठीवर आक्रमण होतंय असं म्हणायचं नाही दिमागात साजरा केला पाहिजे. कोणाची हिमत आहे माझ्या मराठीला आडवं जाण्याची? येऊ द्या आडवं बघतो कोण आडवतो ते. कोणी येतं आणि आम्हाला हनुमान चालीसा शिकवतं? आमचं मारुती स्तोत्र कमी आहे का? “भीमरूपी महारुद्रा…” समर्थ रामदासांनी लिहिलेलं. किती ताकद आहे त्यात. हनुमान चालीसेला विरोध नाही. रामरक्षा आहे. भगवद्गीता आहे. पण पहिली भगवद्गीता ज्ञानेश्वरांनी वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली.

मग भगवद्गीता देण्यापेक्षा आपण एकमेकांना ज्ञानेश्वरी का देऊ नये? ज्ञानेश्वरीतला अर्थ अजून कित्येकांना समजलेला नाही. आजपासून आपण एकमेकांना ज्ञानेश्वरी दिली पाहिजे. मोदी आले तरी त्यांना ज्ञानेश्वरी द्या. मनाचे श्लोक कितीजणांना माहिती आहेत? रोज वाचले तर कोणी भाजपात जाणार नाही. त्यात जगायचं कसं ते दिलं आहे. अहंकार झाल्यावर रावणाची लंका उद्ध्वस्त झाली. तुमचं काय आहे? संतांची परंपरा, वीरांची परंपरा, कलाकारांची परंपरा, योद्ध्यांची परंपरा असा महाराष्ट्र दुसरा दाखवा. रामराज्य हवं? रामराज्याचे दाखले काढा. रामाने जसं राज्य केलं तसं करा. आजचं राज्य रामराज्य आहे का? फोडाफोडी करायची?

आज अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया निर्दोष मुक्त झाले. अभिनंदन करतो. मुख्यमंत्री तुरुंगात टाकायचा, मंत्री तुरुंगात टाकायचा आणि पुराव्याअभावी सुटका? मग अटक करणाऱ्यांना तुरुंगात टाका. हे रामराज्य नाही. अजित दादांवर 70 हजार कोटींचे आरोप. “चक्की पिसिंग” म्हणायचं. बदनाम करायचं. संजय राऊत त्यांनाही सोडलं नाही. आरोप करायचे, तुरुंगात टाकायचं आणि नंतर पुरावा नाही. ईव्हीएम जादूची पेटी वापरून विजय मिळवू नका. मैदानात लढा. मुंबईत मराठी माणसाने ताकद दाखवली. महापौर झाला नाही पण परत होईल. महाराष्ट्रात लोकांच्या डोळ्यावरची पट्टी हळूहळू निघेल.
“असतील शिते तर जमतील भुते.” भुते गोळा करू द्या. ही भुते मानगुटीवर बसतील. डोक्यावर नाचतील. शितं संपतील. भुतांच्या भाराने तिथेच पडाल असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.