उद्याच्या सत्तेची रंगीत तालीम सुरू आहे!- उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाहा बुलंद राजकीय मुलाखत भाग-२

sanjay-raut>>संजय राऊत

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘बुलंद’ मुलाखतीने महाराष्ट्रासह देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीचा पहिला भाग देशातील सर्वच प्रसिद्धी माध्यमांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. मुलाखतीचा दुसरा भाग त्याच वेगात पुढे सरकला… ‘‘२०१४ चा जनमताचा कौल ही जनतेची चूक नव्हती, तर जनतेची फसवणूक होती,’’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. राजकारणात पैशांचा जोर वाढला आहे. हा पैसा कोठून येतोय हे कळले तर इतर राजकीय पक्षांनाही फायदा होईल, अशी मार्मिक टिप्पणी पक्षप्रमुखांनी केली. पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये पाच हजार शेतकऱयांनी इच्छामरणाची परवानगी मागितली आहे. हेच काय तुमचे विकासाचे मॉडेल? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला. उद्धव ठाकरे काय बोलतात, काय हल्ला करतात याकडे सगळय़ांचेच लक्ष लागले आहे. वादळातही शांत राहणारे हे नेतृत्व. त्यांच्याशी पुन्हा चर्चा सुरू झाली.

उद्धवजी, आपण बेधडक आहात, तितकेच संवेदनशील मनाचे कलावंत आहात…

राजकारणात धडका माराव्याच लागतात. संवेदनशील म्हणाल तर ते परंपरेने आले आहे.

पण तुम्ही भलतेच ‘संयमी’ असल्याचा ठपकाही मधल्या काळात तुमच्यावर ठेवला…

संयम हा जगण्याचा एक भाग आहे. फक्त राजकारणातच नाही तर ‘संयम’ सगळय़ातच हवा. नाहीतर देशात काय चाललंय ते पाहताच तुम्ही.

शिवसेनेसारख्या जहाल संघटनेचं नेतृत्व करताना डोक्यावर बर्फ ठेवावा लागतो, जिभेवर साखर ठेवावी लागते, पण हाती अंगार घेऊन पुढे जावं लागतं. तुमचा अनुभव काय आहे? तुमच्यावर जरी हा संयमीपणाचा ठपका ठेवला तरी काही प्रसंगांत तुम्ही बेधडक वागता, हे तुमच्यात कुठून आलं?

प्रांजळपणे सांगायचं तर ही सगळी देण आहे ती शिवसेनाप्रमुख आणि माँची आहे. आपण असं म्हणतो की मुलांवर संस्कार करायचे असतात. संस्कार म्हणजे आई-वडील मुलांची टय़ुशन नाही घेत. त्यांच्याकडे पाहत पाहत मुलं मोठी होत असतात.

तुम्ही कसे मोठे झालात?

मी लहान होतो तेव्हा माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्याकडे मी पाहत होतो. त्यांनी लिहिलेली ‘जीवनगाथा’ अनुभवत होतो. ते आयुष्य वेगळं होतं. शाळेत जायचं ते वय होतं. कलानगर, वांद्रेसुद्धा छोटंसं होतं. संध्याकाळ झाल्यानंतर परवचा, प्रार्थना, मग गृहपाठ या सगळय़ा गोष्टी. मग रात्री जेवण झाल्यानंतर आजोबा असे खुर्चीत बसायचे. मग आम्ही सगळी नातवंडं, मुलं लोळत त्यांच्या गोष्टी ऐकायचो, पण त्या राजाराणीच्या गोष्टी नसायच्या. त्या त्यांच्या आयुष्यातल्या अनुभवांच्या सत्यकथा असायच्या. तेच कळत-नकळत झिरपत झिरपत आमच्यात गेलं आहे. शिवाय शिवसेनाप्रमुखांनी केलेला संघर्ष, उभारलेला लढा, मांडलेले विषय, तो आक्रमकपणा आणि त्या आक्रमकपणाला शांत आणि सौम्यपणाने, खंबीरपणे माझ्या माँने दिलेली साथ. हे सगळे पाहत मी मोठा झालेलो आहे.

बाळासाहेबांचं आयुष्यसुद्धा एक निखारा होता. ती एक वेगळय़ा प्रकारची ‘जीवनगाथा’ होती असं आपल्याला वाटत नाही काय?

आहेच ना, पण निखाऱया निखाऱयात फरक असतो. काही अस्तनीतले निखारे असतात. माझ्यासाठी महत्त्वाचा निखारा म्हणजे चूल पेटवणारा निखारा, जो अन्न देतो. तिसरा ज्याला वैचारिकदृष्टीने बघितले तर अन्याय जाळणारा एक निखारा असतो. शिवसेनाप्रमुखांचा निखारा हा दुसऱया आणि तिसऱया प्रकारचा निखारा होता. अन्याय जाळून टाकणारा आणि त्याच बरोबरीने गोरगरीबांच्या चुली पेटवणारा निखारा होता.

तुमच्या राजकारणात तुम्ही कोणत्या निखाऱयाला महत्त्व देता?

सध्या जे काही अनुभवतोय ते निखाऱयावरून चालणं अनुभवतोय. या सगळय़ात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती ही की, शिवसेनाप्रमुखांसारखं व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही. म्हणून आपण पाहिलं असाल जेव्हा पक्षाची धुरा सांभाळण्याची वेळ आली तेव्हा मी सांगितलं की, ‘शिवसेनाप्रमुख’ ही उपाधी मी माझ्यासाठी लावणार नाही. कारण ती एकमेवाद्वितीय व्यक्ती होती. शिवसेनाप्रमुख म्हटल्यानंतर फक्त बाळासाहेबच. शिवसेनाप्रमुख म्हटल्यानंतर एकच. बाळासाहेबांचं नावसुद्धा नंतर येईल, आधी बाळासाहेबांची प्रतिमा डोळय़ांसमोर येईल. त्यांच्यानंतर शिवसेना कशी जाणार पुढे, काय होणार, कसं होणार ही सगळी निखाऱयावरची वाटचाल होती. पण जसं मी म्हटलं मघाशी की निखाऱया निखाऱयांत फरक असतो. तसंच शिवसेनाप्रमुखांनी प्रज्वलित केलेले शिवसैनिकांसारखे जे प्रखर निखारे माझ्यासोबत राहिलेत, आहेत त्याच निखाऱयांच्या भरवशावर मी शिवसेना पुढे नेतोय.

शिवसेनाप्रमुख आपल्यातच आहेत असं आपण नेहमी म्हणतो…

हो, आहेतच… आहेतच!

बाळासाहेब शरीराने आपल्यात नसतील, पण त्यांचा विचार आपल्यात आहे. त्यांचा आत्मा आहे. शिवसेनाप्रमुख जाताना नक्की तुम्हाला काय देऊन गेले असं तुम्हाला वाटतं?

नेमकं सांगायचं म्हणजे आयुष्यात जगण्यासाठी जे जे लागतं ते सर्व. जी प्रेरणा असते, विचार असतो तो त्यांचाच आहे. वर्णन करायचं झालं तर खूप काही गोष्टी आहेत. मी स्वतःला नक्कीच भाग्यवान मानतो की, शिवसेनाप्रमुखांचा सर्वाधिक सहवास मला लाभला. हे माझं किती जन्मांचं पुण्य आहे मला माहीत नाही. त्यामुळे असं नेमकेपणाने मला नाही सांगता येणार, पण प्रत्येक गोष्टीत कुठे ना कुठे त्यांची शिकवण मला उपयोगी पडत असते.

हा निखाऱयाचा प्रवास सुरू असतो तेव्हा त्यांची तुम्हाला आठवण येते का?

– नक्कीच येते.

 जेव्हा प्रवासात चटके बसतात…

एक गोष्ट नक्की. मी अडून नाही राहणार कधी. अरे, आता शिवसेनाप्रमुख असते तर काय केलं असतं असा विचार करून मी अडणार नाही. त्यापेक्षा मी असे म्हणेन की, आज शिवसेनाप्रमुख असते तर त्यांना अभिमान वाटेल असं मी काहीतरी करायला पाहिजे.

बाळासाहेबांना प्रबोधनकारांनी संस्कार दिले. बाळासाहेबांनी तुम्हाला संस्कार दिले. आदित्य ठाकरे राजकारणात आता स्थिरावले आहेत. ते पक्षाचे नेते म्हणून काम करताहेत. जरी वयाने लहान असले तरी ते मोठं काम करताहेत. वडील म्हणून तुम्ही त्यांना काय संस्कार दिला?

मला नाही माहीत. त्याची मुलाखत तुम्ही घ्याल तेव्हा तुम्ही त्याला विचारा. एक सांगतो, जसं मी तुम्हाला सांगितलं की, शिवसेनाप्रमुखांचा सर्वाधिक सहवास मला लाभला तसंच आदित्यसुद्धा लहान असताना आमच्यापेक्षा त्यांच्याकडेच जास्त असायचा. त्यांच्यासोबत असायचा. त्यांच्याच खोलीत हा नेहमी असायचा. अगदी लहान होता तेव्हापासून… शिवसेनाप्रमुख आणि आदित्यचं छान जमायचं.

आदित्यने राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलंय…

नक्कीच. तोसुद्धा महाराष्ट्रभर फिरतोय.

त्याच वेळी चिरंजीव तेजसने वेगळे कार्य हाती घेतलेय…

तो त्याच्या मार्गाने चाललाय. निसर्ग, पर्यावरण अशा क्षेत्रांत तो नवे प्रयोग करतोय.तेजस जंगलात जातो. नवीन प्राणी, पक्षी यांचा शोध घेतो. त्याच्या शोधास जगन्मान्यता मिळते…

 हीसुद्धा घराणेशाहीच म्हणायची का?

त्याने खेकडय़ाच्या नवीन जाती शोधल्या. मराठी माणूस खेकडय़ाच्या जातीचा. एकमेकांचे पाय ओढणारा…होय. पण त्या खेकडय़ा खेकडय़ांतसुद्धा जाती आहेत हे तेजसने शोधले. नक्कीच खेकडय़ांची नवीन जात त्याने शोधली.

तेजसला हे सर्व कोठून मिळालं?

ही आवडसुद्धा मी म्हणेन थोडीशी घराणेशाही आहे. किंबहुना बरीचशी घराणेशाही आहे. कितीजणांना कल्पना असेल नसेल मला माहिती नाही, पण स्वतः शिवसेनाप्रमुखांना पशुपक्ष्यांची खूप आवड होती. अर्थात सगळय़ा गोष्टी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात करता येतातच असं नाही. माझी पण आवड आहेच. पाळीव प्राणी हा एक भाग झाला, पण जंगलात जाऊन फोटोग्राफी करणे हेही त्याचबरोबरीने आले. तेजसने जो मार्ग स्वीकारलाय तो आणखी वेगळा आहे. त्याला पशुपक्ष्यांबरोबरच झाडं, पानं, फुलं, दगड, शंख-शिंपले यांची शास्त्र्ााrय नावंही पाठ आहेत. मला आठवतंय खूप लहान असताना तो विविध प्रकारचे दगड जमवायचा. तीसुद्धा त्याला आवड आहे. त्याला एक मी पुस्तक दिलं होतं. त्यातली दगडांची चित्रं बघून त्यांचे रंग त्याने समजून घेतले. दगडांत वेगवेगळे रंग असतात त्यानुसार त्याची जात ठरते. दगडांचीसुद्धा जातकुळी आहे. हे सगळं अजब वाटलं तरी एक वेगळं जग आहे. त्यात तेजस रमतो, उत्तम काम करतो. तो खूप खोलात जाऊन अभ्यास करतो.

या मुलाखतीतून मला लोकांना हे सांगायला आवडेल की, तुम्ही सतत उत्तम वाचन करीत असता. तुम्ही सतत नवीन माहिती गोळा करीत असता. शिवसेनाप्रमुख रोज २० ते २२ वृत्तपत्रे वाचायचे. तुम्हीसुद्धा ते करता का?

माझा प्रयत्न असतो. मीही वाचतो. शिवसेनाप्रमुखांच्या वेळी आमच्याकडे यायची ती सगळी वृत्तपत्रं आजही येतात. अर्थात शिवसेनाप्रमुख खूपच बारकाईने वाचायचे. मला आश्चर्य वाटायचं आणि कौतुकही वाटायचं की ते नुसते वाचायचे नाहीत तर त्यातली एखादी माहिती किंवा बातमी महत्त्वाची वाटली तर कापून ठेवायचे आणि ज्या विषयाची ती बातमी आहे त्या विषयाची ज्याला आवड आहे त्याला ते कात्रण पाठवून द्यायचे की ‘हे वाच’ हे तुझ्यासाठी उपयोगी आहे. मी तेवढय़ा बारकाईने नाही वाचत. अर्थात त्यांची नजर ही व्यंगचित्रकाराची होती. त्यामुळे त्यांना सगळय़ा भाऊगर्दीत नेमकं काय वाचायचं हे कळायचं. मी तसं वाचण्याचा प्रयत्न करतो, पण माझं वाचन हे थोडेसं राजकीय असतं. काही वेगळय़ा विषयाची माहिती असेल तर नक्की वाचतो.

बाळासाहेब व्यंगचित्रकार होते. त्यामुळे ते नेहमी म्हणायचे, मी बिटवीन द लाइन्स वाचतो. दोन ओळींमधले वाचण्याचा प्रकार ते करायचे. राजकारणात वा समाजकारणात वावरताना तुम्हाला कधी ‘बिटवीन द लाइन्स’ वाचाव्या लागतात का?

वाचाव्याच लागतात. नाहीतर नुसती बातमी वाचली तर टी.व्ही.वर न्यूज रीडरसुद्धा वाचत असतो. मग त्याच्यात आणि आपल्यात फरक नाही. त्या बातमीचा अर्थ, त्या बातमीचा दूरगामी परिणाम काय होतो याचा आणि त्या बातमीचा आशय समजून घ्यायचा प्रयत्न करतो. आता सवय झालीय. एकदा वाचल्यानंतर लगेच हे सारं लक्षात येतं.

सध्याची जी बातमीदारी आहे- मग ते इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल- तुम्ही बातम्यांवर किती विश्वास ठेवता? किती गांभीर्याने घेता?

एक गोष्ट अशी आहे की, जे माझे आजोबा सांगायचे ते शिवसेनाप्रमुखांनी तुम्हालाही सांगितलंय. बातमी ही बातमीसारखी दे. बातमीत कॉमेंट नको. त्याच्यावर तुला कॉमेंट द्यायचीच असेल तर दुसऱया दिवशी अग्रलेख लिही, लेख लिही, काही लिहायचंय ते लिही. ते मत तुझं दुसऱया दिवशी मांड. बातमी देताना ती बातमीसारखीच लिहिली गेली पाहिजे. त्याच्यात अर्थाचा अनर्थ करणारी वाक्यं नकोत. अनेकदा बातमीतच अग्रलेख दिसायला लागतात.

हो, शिवसेनाप्रमुख सांगायचे की, बातमीत कॉमेंटस् नकोत…

हो, कॉमेंटस् नकोतच. हल्ली सगळी कामं एकत्र व्हायला लागलीत. बातमीदारसुद्धा संपादकाचं काम करतात. संपादक बातमीदाराचं काम करतात. अशी ती सरमिसळ चालू झालीय.

सध्या जो ‘सोशल मीडिया’ नावाचा विचित्र प्रकार आलेला आहे हा समाजाच्या दृष्टीने किती हितकारक आहे असं आपल्याला वाटतं? राजकारणात हे हत्यार म्हणून वापरले जाते. विरोधकांना नाउमेद करण्यासाठी, खतम करण्यासाठी, बदनामीसाठी. परवासुद्धा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा महाराष्ट्रात आले तेव्हा त्यांनी त्यांच्या सायबर फौजेला मार्गदर्शन केले. काँग्रेस पक्षही वेगळय़ा पद्धतीने प्रयत्न करीत असतो. राजकारणात टिकून राहण्यासाठी हे किती गरजेचे आहे?

काळाप्रमाणे तंत्रज्ञान विकसित होतंय मला असं वाटतं. प्रत्येक गोष्टीचा उपयोग, दुरुपयोग आणि निरुपयोग या तिन्ही गोष्टी आहेत. एक उदाहरण देतो. समजा, एखाद्याची चांगली गाडी आहे, पण त्या गाडीतून जाणार कुठे हे त्याला कळलं पाहिजे. चालवायची कशी हे त्याला कळलं पाहिजे. नाहीतर नुसती गाडी चांगली घेऊन उपयोग नाहीय. मोबाईल फोन घेतला, पण कुणाला फोन करायचा आणि काय बोलायचं हे कळलं पाहिजे. तसंच हा सोशल मीडिया… याचा चांगला उपयोग करता येऊ शकेल असा हा मीडिया आहे. सगळय़ांनी एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की मी जे करतोय ते चांगल्यासाठी झाले पाहिजे. प्रत्येक गोष्टीचा शोध चांगल्यासाठी लागतोय आणि त्याचा वापर चांगल्यासाठी केला तरच अशा माध्यमांचा उपयोग होईल.

अनेकांना माहीत नसेल, पण मी नेहमी आपल्याला पाहत असतो. वेळ मिळेल तेव्हा तुम्ही उत्तम संगीत ऐकत असता. तुमच्या आवडीची गाणी तुम्ही ऐकता. ही आवड पहिल्यापासून आहे का?

मला या प्रश्नावरून पूर्वी ब्लॅक ऍण्ड व्हाईट टी.व्ही.च्या वेळी एक कार्यक्रम दाखवला जायचा ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ त्याची आठवण झाली. त्यात कसं ते ‘एकदा काय झालं’ असं म्हणून सुरुवात व्हायची. तसं काही मी सांगत बसणार नाही, पण पुन्हा एकदा मी माझ्या बालपणीच्या काही गोष्टी सांगेन. त्या वेळचा तो काळ होता. तेव्हा ट्रान्झिस्टर पण नव्हता. नंतर छोटा ट्रान्झिस्टर आला. छोटासा. त्या वेळी छोटा ट्रान्झिस्टर हे एक मोठं अप्रूप होतं. त्याचा शोध लागणं हे एक अपूप होतं. त्याआधी मोठा रेडिओ असायचा. चार बटणंवाला. त्यात संध्याकाळ झाल्यानंतर ७ च्या बातम्या. मग बिनाका गीतमाला, मग कधी शास्त्र्ााrय संगीत हे असे कार्यक्रम आजोबांच्या खोलीत ऐकायला मिळायचे. तो काळ तसा होता. हे ऐकत ऐकत आम्ही वाढलो. हे केवळ माझ्या लहानपणीच नाही, आतासुद्धा मुलं संगीतवेडी आहेतच. त्यामुळे संगीत किंबहुना कला घरात आहेच. माझं तर मत असं आहे की, प्रत्येकाला काही ना काही कला आलीच पाहिजे. कलेची आवड असलीच पाहिजे. तरच आपलं जीवन अधिक चांगलं होऊ शकेल.

 सध्या कोणतं गाणं तुम्ही ऐकताय किंवा कुणाचं गाणं तुम्ही ऐकताय?

– जे चांगलं वाटेल ते काहीही ऐकतो मी. जे मनाला चांगलं वाटतं ते ऐकतो.

प्रत्येकाला एखादी कला यायला हवी असं तुमचं म्हणणं आहे. आपल्या कुटुंबात प्रत्येकजण काही ना काही कला घेऊन जन्माला आलेला आहे. तुम्ही तुमच्या हातात कॅमेरा घेतलात आणि सातत्याने त्यात तुम्ही आपल्या पद्धतीने फोटोग्राफी करीत असता. हा कॅमेरा तुम्हाला किती आनंद देतो?

खूप आनंद देतो. जेव्हा वेळ मिळेल त्या वेळी मी फोटोग्राफी करतो, जरूर करतो. फोटोग्राफीचं गेल्या वेळी मी प्रदर्शन भरवलं होतं. त्यातले फोटो मी विकले होते. विकल्यानंतर त्यातून साधारणतः पाच-साडेपाच कोटी रुपये जमा झाले. समाधानाची गोष्ट अशी की, या पैशाचा मोठा भाग मी आधीच सांगितल्याप्रमाणे शेतकऱयांसाठी वापरला. आजसुद्धा जिथे गरज असते तिथे यथाशक्ती माझ्या परीने मी काही ना काही करीत असतो. हा एक मला मोठा आनंद देणारा क्षण असतो की माझ्या कलेतून मी काही तरी करतोय. जसे शिवसेनाप्रमुखांनी त्यांच्या कलेतून हे साम्राज्य उभं केलं. काही साम्राज्ये खालसा केली. मराठी माणसांना आणि हिंदूंना एक ताकद दिली. ही त्यांच्या कलेची किमया. अनेक वक्ते हे करू शकले नसते. इतर नेत्यांनीही केले नाही, पण शिवसेनाप्रमुखांनी ते केले. कारण त्यांच्यातला असलेला व्यंगचित्रकार.

तुम्ही पदवीधर आहात का?

(बोटावरील मतदानाची खूण दाखवत) हे पहा.

अच्छा, ही पदवीधर मतदारसंघाच्या मतदानाची खूण आहे का?

हा माझ्याकडे पुरावा आहे. पण असं का वाटलं तुम्हाला की मी पदवीधर नसेन? चांगलं स्वच्छ राजकारण करतो म्हणून?

तसंही असेल. कारण जे खूप पदव्या घेऊन राजकारणात सध्या आले आहेत त्यापेक्षा ज्यांच्याकडे पदवी नाही आणि अनुभव ज्यांनी घेतलाय ते उत्तम राजकारण करतात असे दिसते…

एक माहिती म्हणून सांगतो. स्वतः शिवसेनाप्रमुख आणि माझ्या आजोबांना सहावी- सातवीत शाळा सोडावी लागली होती.

गेल्या काही दिवसांत मित्रपक्षाकडून तुम्हाला खूप पदव्या आणि उपाध्या दिल्या जाताहेत. तुम्हाला पद्मश्री, पद्मविभूषण अशी जरी पदवी नसली…

छे! ती त्यांच्याकडून अजिबात नकोच मला…

वांद्रय़ाचा बॉस, माफिया वगैरे वगैरे उत्तम प्रकारच्या पदव्या आपल्याला दिल्यात…

असू द्या. त्यातही एक मस्ती आहे.

या पदव्या जेव्हा आपल्याला दिल्या जातात तेव्हा आपल्याला काय वाटतं?

माझं मत आहे की, उगाच दुसऱया बॉसची चाटुगिरी करण्यापेक्षा स्वतः बॉस झालेलं मला केव्हाही आवडेल. जे दुसऱयाला बॉस मानून त्याची जी काही चाटुगिरी करताहेत त्यांना मीसुद्धा बॉस वाटत असेन तर आनंद आहे.

तुम्ही एका बलाढय़ संघटनेचे नेतृत्व करताय. अलीकडच्या काळात राज ठाकरे यांनीसुद्धा आपल्यावर काही व्यंगचित्रं काढली ती तुम्ही पाहता काय?

तशी ती कुठे प्रसिद्ध झाल्याचं मी बघितलं नाही. किंबहुना माझ्यासमोर ती कुठे आलेली नाहीत.

राजकारणात व्यंग शिल्लक आहे असं तुम्हाला वाटतं?

त्याशिवाय दुसरे काही राहिलंय असं मला वाटत नाही.

बाळासाहेबांची एक नजर होती व्यंगचित्रकाराची. तुम्हीसुद्धा त्याच नजरेने अनेकांकडे पाहताय. बाळासाहेब शेवटी म्हणायचे की, आता राजकारणामध्ये मॉडेल दिसत नाहीत… पण आता अचानक ही मॉडेल्स दिसू लागली आहेत, ज्यांच्यावर बाळासाहेबांनी त्यांच्या कुंचल्याचे फटकारे ओढले असते आणि देशाला व महाराष्ट्राला त्यांच्या व्यंगचित्रकलेतून मार्गदर्शन केलं असतं. अशी तुम्हाला मॉडेल्स समोर दिसताहेत का?

आहेत, मॉडेल नक्कीच आहेत आणि ती कोण असावीत ही जी तुमची अपेक्षा आहे तीच आहेत. त्यामुळे मला उगाच त्यांची नावं घेण्याची आवश्यकता नाही. कारण मला असं वाटतं की, बाळासाहेबांनी अर्थात त्यांच्या वक्तृत्वाने फटकारे मारले असते आणि कुंचल्यानेही मारले असते ते काम मी माझ्या शब्दांनी करतो.

ते महाराष्ट्राने स्वीकारलंय…

हा महाराष्ट्राचा मोठेपणा आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दहा वर्षांत अनेक लहान पक्ष आणि नेतृत्व आपल्या विरोधामध्ये उभी राहिली. उद्धव ठाकरे यांना आव्हान देण्यासाठी. काय झाले शेवटी त्यांचे? कुठे गेले सगळे ते? शिवसेनेला संपवण्यासाठी त्यांनी विडेच उचलले होते. त्या विडय़ांचं पुढे काय झालं ते आपल्याला माहीत आहे…?

विडे खाऊन पिचकाऱया मारून लोक मोकळे झालेत.

नारायण राणे भारतीय जनता पक्षात गेलेत…

मी भारतीय जनता पक्षाला शुभेच्छा दिल्या आहेत.

छगन भुजबळ तुरुंगातून मुक्त झाले आणि तुम्हाला पेढे पाठवले. ज्या छगन भुजबळांनी शिवसेनेच्या विरोधात, शिवसेनाप्रमुखांच्या विरोधात वातावरण निर्माण केले, किंबहुना त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांना शेवटी तुम्हाला पेढे पाठवावे लागले…

अनुभवातून जर त्यांना गोडपणा आला असेल तर मी काय करू.

पण राज ठाकरेंचे नगरसेवक तुम्ही फोडलेत…

मागे कधीतरी मला एकदा मुलाखतीत विचारलं होतं की, तुमची पार्टी ही रिजिनल पार्टी आहे.  म्हटलं ऑफकोर्स आहे. पण ती ओरिजिनल आहे. माझी पार्टी शिवसेनाप्रमुखांनी दुसऱयाचा पक्ष फोडून स्थापन केलेली नाही. ती शिवसेना म्हणूनच स्थापन झाली आणि शिवसेना म्हणूनच आहे आणि ती शिवसेना म्हणूनच राहील. तिने तिचं कधीही नाव, नेता किंवा निशाण बदललं नाही आणि दुसरा पक्ष फोडून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन नाही केला. मुळामध्ये जो पक्ष माझा पक्ष फोडण्याचा प्रयत्न करूनच स्थापन झाला होता तो पक्ष फुटला म्हणजे नेमकं काय झालं?

त्यांचं नशीब फुटलं…

होय, माझं म्हणणं हेच आहे की मुळातच माझं जे तुम्ही घेऊन गेला होतात ते माझ्याकडे परत आलं असेल तर मी कुठे काय फोडलं? विचार तोच, माणसं तीच, नवीन काय केलंत? निर्माण काय केलंत?

भारतीय जनता पक्ष हा एका विचारांचा पक्ष होता.  पण २०१४ साली त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून अशी माणसं उचलली जी त्यांच्या विचारांची नव्हती…

शिवसेनेतूनदेखील घेतली.

यास तुम्ही काय म्हणाल?

काय म्हणावं?

विचार हरवला… सत्तेसाठी.

नेमका विचार होता का हाच आता विषय आहे. हे जे नवीन राजकारण भाजपने सुरू केलंय… हे राजकारण ‘वाल्या’ या शब्दाभोवती गेले काही दिवस फिरत आहे…

मला वाटतं तुम्ही त्या वाल्याचा काय किंवा नंतर बनलेल्या वाल्मीकी ऋषींचा अपमान करू नका. ते वेगळे होते. वाल्याचा वाल्मीकी होण्यासाठीसुद्धा तपश्चर्या करावी लागते. तशी तपश्चर्या त्यांनी केली तेव्हा ते वाल्याचे वाल्मीकी झाले. नुसतं खुर्चीत बसला  आणि आशीर्वाद दिला म्हणजे वाल्याचा वाल्मीकी नाही होत. वालाला कदाचित मोड येतील, पण सध्याच्या वाल्याचा वाल्मीकी करून तुम्ही वाल्मीकींचा अपमान करू नका. वाल्मीकींनी प्रचंड तपश्चर्या केली म्हणून ते ऋषी झाले… म्हणून वाल्याचा वाल्मीकी ऋषी.  ऋषी हा शब्द महत्त्वाचा आहे. हे कसले ऋषी! हाच साधू आणि संधिसाधूत फरक आहे. साधू वेगळा आणि संधिसाधू वेगळा… हे संधिसाधू आहेत.

वालाला मोड आले तसे तुम्हीसुद्धा राजकारणामध्ये अनेकांना मोड आणले आहेत…

आणलेत, त्याला मी काय करू? आता आपलं राजकारणच अशा एका मोडवरती आहे…

ही मोडामोडी कधी संपेल?

कोंब फुटल्यावर.

देशाच्या, किंबहुना राज्याच्या राजकारणामध्ये शिवसेनेच्या विचारांचे कोंब आता वाढू लागले आहेत…

याचा अर्थ शिवसेनेचा विचार आता लोकांना अधिक आवश्यक वाटू लागला आहे.

जेव्हा छगन भुजबळ तुरुंगात होते तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून विरोधाचा सूर निघाला की भुजबळांच्या बाजूची एक कोठडी रिकामी आहे… त्या रिकाम्या कोठडीची भीती दाखवून चार वर्षे राज्य केलं… त्या रिकाम्या कोठडीचं नेमकं काय झालं? आणि आता तर भुजबळांचीच कोठडी रिकामी झाली आहे.

म्हणजेच त्या रिकाम्या कोठडीच्या बाजूला आणखी एक कोठडी रिकामी झाली आहे ना! मग शेवटी केलंत काय तुम्ही? ज्या भ्रष्टाचाराचे आरोप करून सत्तेवरती आलात तुम्ही. अर्थात आम्हीही तुमच्यासोबत तेव्हा होतो. मग नेमका भ्रष्टाचार झाला का? काय झालं पुढे त्या आरोपांचं? 2 जी घोटाळा… काय झालं पुढे? 2 जी घोटाळा हा केवळ देशात नव्हे तर जगात गाजला होता… त्या वेळी तर आपल्या देशाचं चित्र इतकं भयानक केलं गेलं होतं की आपल्या देशासारखा दुसरा भ्रष्टाचारी देशच या जगात नाही. आपल्या देशाची आपणच बदनामी केली होती जगामध्ये. हे कुणाच्या लक्षातच नव्हतं आलं…त्याचं पर्यवसान असेल की सत्ताबदल झाला…मग त्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचं झालं काय? नुसते आरोपामागून आरोप…आणि आजही ६० वर्षांच्या भ्रष्टाचारावरच तुम्ही बोलताय. मग का नाही एकदासुद्धा सिद्ध केलात भ्रष्टाचार?

महाराष्ट्रात जलसिंचन घोटाळा झाला…

आता परवा परत सवा लाख कोटी दिलेत महाराष्ट्राला सिंचनासाठी. म्हणजे आधीचे गेलेत. आता पुन्हा हे कधी येतील आणि हे कधी वाटले जातील आणि कधी त्याचं सिंचन होईल माहीत नाही.

म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्ध लढाईत किंवा भ्रष्टाचार संपवण्यामध्ये सध्याचे राज्यकर्तेसुद्धा गंभीर नाहीत…

हा प्रश्न आता सगळय़ांना विचार करायला लावणारा आहे. प्रत्येक वेळी एखाद्याने काम केलं की लगेच त्याच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप होतो आणि काम नाही केलं तर निक्रियतेचा ठपका बसतो. भ्रष्टाचार खरंच झाला असेल तर सिद्ध करा…बदनाम करून नुसतीच चिखलफेक करून पळू नका…दुसऱयावरती चिखल उडवून पळून जायचं आणि आपल्या हातात कमळ ठेवायचं असं नाही चालणार.

२०१४ साली स्वतः नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका केली होती…

ते त्यांचे गुरू आहेत.

काका आणि पुतण्यांनी महाराष्ट्र लुटला असा त्यांचा ‘नारा’ होता…

त्यांनीच तर त्यांना सांगितलं ना की, हे माझे गुरू आहेत. त्यांचंच बोट धरून मी राजकारणात आलो.

मग गुरुपौर्णिमेला मोदी बारामतीला येणार आहेत का?

त्यांचा प्रश्न आहे तो…

तुम्ही चार वर्षे सत्तेमध्ये आहात… तुमचं स्वतःचं एक व्हिजन आहे… त्याला मी ब्लू प्रिंट म्हणत नाही…

ब्लू झब्बा आहे आता.

तुमचं एक व्हिजन आहे की महाराष्ट्रासाठी मला या गोष्टी करायच्या आहेत. मग आरोग्य क्षेत्रात असतील, उद्योग क्षेत्रात असतील, सामाजिक क्षेत्रात असतील, कला क्षेत्रात असतील. अनेक योजना असतील. यातल्या किती योजनांना तुम्ही चार वर्षे सत्तेत राहून मूर्तस्वरूप देऊ शकलात?

सांगतो. चांगला विषय आहे हा… मुळात माझी खूप तळमळ राज्यासाठी काम करण्याची आहे. ती गेल्या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाताना वचननाम्याच्या माध्यमातून लोकांना दिली होती. २०१४ साली मी दिलेला शिवसेनेचा वचननामा आजही काढून पहा, त्यापैकी एकही गोष्ट मी अधांतरी दिलेली नव्हती. या गोष्टी मी खातरजमा करून दिल्या होत्या. त्यामध्ये शिवआरोग्य सेवा, म्हणजे टेलिमेडिसीन… त्याचं प्रात्यक्षिक मी स्वतः बघितलेलं… त्याच्याप्रमाणे आजही माझ्या माहितीप्रमाणे मध्ये मध्ये कॅम्प घेतले जातात. ती योजना सरकारी यंत्रणेला दाखवली. स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो… ‘मुख्यमंत्री म्हणाले, उद्धवजी, शिवआरोग्य सेवा या नावासह ही योजना घेतली, आम्ही करणार…’ पुढे त्याचं काय झालं मला माहीत नाही…मी करून दाखवलेली योजना आहे.

 शिक्षणात तुम्हाला नवे काही करायचे होते…

मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं…मी त्या टॅबमधनं ते ओझं कमी कसं करायचं हे दाखवलंय. तो काही माझा व्यवसाय नाही. आधी एक-दोन वर्षे शिवसेनेच्या माध्यमातून काही शाळांना आणि बालकांना हे टॅब वाटले…पण हा काही माझा धंदा नाही…एका ठिकाणी म्हणजे माथेरानच्या पायथ्याशी…त्याला गाव म्हणायचे तरीसुद्धा गाव हा मोठा शब्द होईल. इथे १५-2० घरं तिथे १५-2० घरं. अशा विखुरलेल्या वस्तीमध्ये, जिथे जायला धड रस्ताही नाही, वीज नाही, अशा घरांमध्ये मी सोलार एनर्जीच्या माध्यमातून तिथे दिवे आणि इतर काही गोष्टी दिल्या. पण ही योजना मोठय़ा प्रमाणावर करायची असेल तर ती सरकारने एकदा घेतल्यानंतर ती पुढे नेली पाहिजे.

मग या सर्व योजनांना गती कधी मिळणार?

पक्ष म्हणून जेवढी शिवसेनेची ताकद आहे तेवढी मी केली आणि करणार…करतो. नवीन नवीन योजना आहेत… अशा अनेक गोष्टी याचं उदाहरण म्हणून मी दाखवून दिलं, पण पुढे त्या नेल्या गेल्या नाहीत. जसं आपण मुंबईत बघत असाल ‘मोबाईल बाइक असिस्टंट’…ऍम्ब्युलन्स नाही, ऍम्ब्युलन्स येण्याच्या आधीसुद्धा पहिला जो एक गोल्डन अवर म्हणतो त्या काळात एखाद्या अपघातग्रस्तास किंवा रुग्णाला मेडिकल मदत मिळाली तर त्याचे प्राण वाचू शकतात. तर ती योजना आपण सुरू केली…अशा अनेक काही काही योजना आहेत… ती मोबाईल बाइकची योजना सुरू आहे, पण शिवआरोग्य सेवेची टेलिमेडिसिन योजना धूळ खात पडली. कारण त्याच्यासाठी ‘बँड विथ’चा वगैरे खर्च येतो दरवर्षी. अशा अनेक योजना आपण सुरू केल्या.

 तरीही आपण सत्तेतले भागीदार आहातच. या चार वर्षांच्या काळात सत्तेमध्ये तुम्ही नेमकं काय कमावलं?

मी कमावण्यासाठी राजकारणात आलेलोच नाही.

मी राजकारणाच्या संदर्भात बोलतोय… आपला एवढा बलदंड पक्ष सत्तेत आहे. नाही म्हटलं तरी महत्त्वाची खाती आपल्याकडे आहेतच…

ठीक आहे. सांगतो. काय कमावलं किंवा काय मिळवलं विचाराल तर सरकार चालवण्याचा अनुभव कमावलाय.

हे कसं म्हणू शकता?

का नाही म्हणू शकत? शिवसेनाच काय सर्वच राजकीय पक्षांची नवी पिढी राजकारणात आलीय. मी त्यांच्याकडे उद्याचे सक्षम राज्यकर्ते म्हणून बघतोय. शिवसेनेचं आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार 2० वर्षांपूर्वी येऊन गेले. त्यातले आता दोन-पाच लोकच सभागृहात असतील. बरेच लोक नव्याने निवडून आलेत. मंत्री म्हणून काम करण्याचा प्रशासनाचा त्यांना एक अनुभव मिळाला. किंबहुना राज्य चालवण्याची रंगीत तालीम झाली. सत्ताधारी म्हणून काय करायला हवं, काय करायला नको हे आता त्यांना चांगलं कळलेलं आहे. योजना कशा राबवायच्या हे महत्त्वाचं असतं.

आपण खूप मोठा संघर्ष करून कर्जमुक्तीची घोषणा केली ती लोकांपर्यंत पोहोचू शकली नाही…

तेच ना… तेच तर सांगतोय. कर्जमुक्ती करण्याची खरोखर इच्छा असेल तर… नुसत्या निवडणुका जिंकण्यासाठी या घोषणा नकोत. घोषणा केल्यानंतर अंमलबजावणी व्हायला हवी. आताही विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन नागपूरला झाले. विधिमंडळाचे हे अधिवेशन विदर्भात अथवा नागपूरला घेण्यास आमचा विरोध नव्हता, पण नेहमी हिवाळय़ात हे अधिवेशन तिकडे होतं…या वेळेला पावसाळय़ात का घेतलं मला कल्पना नाही.

 हे हट्टाने केलं जातंय…

असेल. हा हट्ट पुरवण्याची आमची तयारी आहे, पण तो पुरवताना विदर्भासाठी तुम्ही नेमक्या काय घोषणा की योजना केल्यात, ज्याची तुम्ही खरंच अंमलबजावणी करू शकता. फक्त घोषणा नकोत. पावसाळी अधिवेशन तिकडे म्हणून घोषणांचा पाऊस नकोय मला. करू शकाल अशा योजना तिकडे मला पाहिजे होत्या. नुसत्या घोषणा…आम्ही एवढे देऊ… तेवढे देऊ… परवा नितीन गडकरी यांनी घोषणा केली की, सवा लाख कोटी देऊ…असे अनेक कोटी आले आणि गेले…लोकांनी पाहिले. कुठे गेले माहीत नाही. आले की नाही हेही माहीत नाही.

एक प्रश्न असा आहे की, महाराष्ट्र अखंड आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रांताला, भागाला तेवढंच स्थान आणि महत्त्व मिळायला हवं. राज्यकर्ता कोणत्याही प्रांतातला असला तरी त्याने अखंड महाराष्ट्राचा विचार करावा असं वाटत नाही काय?

अखंड महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्राचा विचार म्हणजे अखंड महाराष्ट्र आलाच. अखंड महाराष्ट्र हा शब्दच मला खटकतो. मला पसंत नाही. महाराष्ट्र हा महाराष्ट्रच आहे…तो अखंडच आहे. पुन्हा वेगळा अखंड महाराष्ट्र हा शब्दच वापरण्याची गरज नाही.

पण अखंड महाराष्ट्र हा शब्द प्रचलित कधी झाला? जेव्हा भारतीय जनता पक्षाचं राज्य महाराष्ट्रामध्ये आलं. त्यानंतर जे आक्रमण सुरू झालं… महाराष्ट्र तुटेल का… म्हणून आपण सातत्याने अखंड महाराष्ट्र… महाराष्ट्र अखंड हा शब्दप्रयोग वापरायला सुरुवात केली… हे दुर्दैव जरी असलं तरी सत्य आहे… विदर्भाच्या बाबतीत घोषणा होत असतात, त्याही सातत्याने… आता भविष्यातले काही डाव आपल्याला दिसताहेत?

महाराष्ट्र म्हटल्यानंतर वेगळा अखंड शब्द वापरण्याची गरज नाही. महाराष्ट्राविषयी शिवसेनाप्रमुखांनीसुद्धा ते दाखले दिलेले आहेत. मंत्रिमंडळ एक अस्तित्वात येत असतं. त्यात मुख्यमंत्री, मंत्री, ती खाती, किती खाती कोणाला जातात…आता एखादी व्यक्ती त्या विभागाची असेल तर त्या विभागासाठी ते खातं दिलं असं समजायचं का? कारण ते राज्याचं खातं असतं. आतापर्यंत आपण जो एक प्रचार करत होतो की सगळी महत्त्वाची खाती पश्चिम महाराष्ट्राकडे… विदर्भाकडे फक्त काय कुक्कुटपालन. आता मुख्यमंत्र्यांसह गृहमंत्री, अर्थमंत्री, ऊर्जामंत्री ही महत्त्वाची खाती विदर्भाकडे आहेत.

 केंद्रातसुद्धा आहेत…

महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर इथेही महत्त्वाची खाती विदर्भाकडे आहेत. मी तर म्हणतो, अख्खा महाराष्ट्रच आम्ही तुम्हाला चालवायला दिलाय. मग आता तुम्ही विदर्भासाठी नेमकं काय केलंय? अख्खा महाराष्ट्रच तुम्हाला चालवायला दिल्यानंतर महाराष्ट्राने कधी कुरबुर नाही केली की विदर्भाचा मुख्यमंत्री झाला… शेवटी तोही महाराष्ट्राचाच आहे. अर्थमंत्री विदर्भाचा झाला.. अशी कुरबुर नाही केली. कारण हे सगळेच महाराष्ट्राचे आहेत. मग त्या वेळी कुक्कुटपालन खातं विदर्भाकडे होतं म्हणून एक कुत्सितपणा असायचा. आता नेमकं उलट झालं असेल, झालं असेल, पण तो माझ्या महाराष्ट्राचाच माणूस आहे. मी कुठे म्हणतोय हा विदर्भाचा आहे… हा त्याचा आहे, तो त्याचा आहे…

महाराष्ट्रात मराठवाडा हा कायम मागासलेला आहे…

होय. आहेच. त्याशिवाय उत्तर महाराष्ट्र आहे. माझा कोकण आहे.

कोकण आहे, उत्तर महाराष्ट्र आहे.. हे कायम गरिबीत जगणारे भाग आहेत, पण त्यांनी कधी आपलं रडगाणं गायलं नाही. अगदी खरं आहे ते. कष्ट तर करावेच लागतात. महाराष्ट्राच्या प्रवाहात सतत सामील राहिले, संकटात एकत्र राहिले, दुःखात एकत्र राहिले. रडगाणं गाऊन त्यांनी कधी राजकारण केलं नाही. अशा महाराष्ट्राचं नेतृत्व संपूर्ण राज्याचं हित पाहणारं असावं असं आपल्याला वाटत नाही का?

तसंच पाहिजे…जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री म्हणून किंवा मंत्री म्हणून शपथ घेता तेव्हा ती शपथ सर्वांशी समानतेने वागण्याची असते.

जसं मोदींचं सगळय़ात जास्त लक्ष आज गुजरातकडे आहे… अमित शहांचं लक्ष गुजरातकडे आहे…

मला नाही वाटत… मोदींचं लक्ष गुजरातकडे आहे.

ज्या पद्धतीने गुजरातबाबत त्यांचं धोरण असतं….

नाही हो. मला नाही वाटत त्यांचं लक्ष गुजरातकडे आहे. मला असं वाटतं, त्यांचं लक्ष परदेशाकडे आहे…

जगातला कुठलाही नेता आपल्या देशात आला की ते त्याला सर्वात आधी अहमदाबादला घेऊन जातात… पूर्वी मुंबईला आणत होते… दिल्लीत फिरवायचे…

त्याच गुजरातमधली बातमी वाचली होती ना आपण. जवळपास पाच हजार शेतकऱयांनी इच्छामरणाची परवानगी मागितली होती… का? हाच तो विषय जो पहिल्या भागातल्या मुलाखतीत झाला. की जो काही तथाकथित विकास… तो त्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करून करणार आहेत…

महाराष्ट्राचं भाग्य बदलण्याची ताकद चांगल्या राज्यकर्त्यांमध्ये असू शकते का?

का नाही? दुसरं कोण करणार?

मग का बदलले जात नाही?

नाही नाही. तुमच्या प्रश्नाचा पहिला भाग पाहा ना तोच काय आहे.

म्हणजे नेमकं तुम्हाला काय म्हणायचं आहे?

बघा ना, तुमचा प्रश्न काय आहे.

महाराष्ट्राच्या भाग्याचे सध्या दशावतार सुरू आहेत. उद्योग क्षेत्रात आपण पिछाडीला जातोय…

नाही, तसे नाही. तुम्ही जे म्हणालात भाग्य बदलण्याची ताकद.

हो, चांगल्या राज्यकर्त्यात असायला पाहिजे…

पण आधी त्यासाठी चांगला राज्यकर्ता असायला पाहिजे. तर ते भाग्य बदलेल ना!

मग हे राज्यकर्तेपद शिवसेनेकडे कधी येणार?

जनतेने ठरवलं की येणार… आणि मला खात्री आहे, आतापर्यंत जनतेने सगळय़ा पक्षांचा किंवा इतर दशावतारांचा अनुभव घेतला आहे. शिवसेनेच्या एकटय़ाच्या सत्तेचा कधी अनुभव घेतलेला नाही आणि म्हणून मी म्हटलं ना की, मी माझ्या लोकांना हा सत्तेचा अनुभव घ्यायला दिलेला आहे.

म्हणजे संकट म्हणून जे आलंय ते तुम्ही संधी मानताय का?

नक्कीच.

२०१४ चा जनमताचा कौल ही जनतेची चूक होती असं वाटतं का आपल्याला?

नाही…असं नाही मी म्हणत… ती जनतेची फसवणूक होती. आणि मी म्हणून म्हणतो की, समजा त्या वेळी आम्ही सत्तेत सहभागी नसतो झालो, ज्या पद्धतीने आज भारतीय जनता पार्टी राज्ये जिंकत चाललीय. वाट्टेल त्या पद्धतीने…जसे त्रिपुरामध्ये… काँग्रेस, तृणमूल पक्ष फोडूनच राज्य स्थापन केलं, तसं महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी वगैरे फोडून त्यांनी आपलं राज्य स्थापन केलं असतं तर पुन्हा आम्ही बोंबलतच राहिलो असतो रस्त्यावर. त्याच्यापेक्षा मी माझ्या लोकांना कारभाराचा अनुभव घेऊ दिला.

देशाच्या राजकारणात निवडणूक ग्रामपंचायतीची असो वा लोकसभेची असो, पैशाचा वापर पन्नास वर्षांत कधी झाला नव्हता एवढा व्हायला लागला आहे. प्रत्येक निवडणूक पैशाचा आणि सत्तेचा वापर करूनच जिंकायची…

असं चाणक्यानं म्हटलं आहे का?

अशा प्रकारची नवीन राजनीती नवीन चाणक्याने सुरू केली आहे…

नाही, पण असं चाणक्याने म्हटलं होतं का, मी नाही वाचलेलं.

उद्धवजी, पण हा पैसा येतो कुठून. याचं मूळ काय, याची गंगोत्री काय…?

हे आपल्याला कळलं असतं तर आपण नसता कमावला! त्यामुळे ज्यांच्याकडे हा पैसा आहे त्याला विचारायला हवं की हा पैसा येतो कुठून.

नक्की, पण तुम्ही पैशाचा वापर करणार नाही?

नाहीच करणार!

ज्याप्रकारे या पैशाच्या लाटा उसळल्या आहेत…

सांगतो ना. शिवसेनाप्रमुख म्हणायचे ना, की ही लोकशाही मला मान्य नाही ती ही लोकशाही. आता ‘ईव्हीएम’बद्दल जो संशय व्यक्त केला जातो…ईव्हीएम मॅनेज होतात का? होत असतील किंवा नसतील पण. मी मघाशी पदवीधर निवडणुकीबद्दल बोललो… तिथे बॅलेट पेपर होता. तिथे तुम्हाला कळत होतं की, शिक्का किंवा ती खूण कुठे गेली आणि आता तो जो काही प्रकार आहे ‘आरटीआय’… त्याच्यात तुम्हाला इतरांच्या माहित्या कळतात, पण स्वतःचं जे मत आहे ते कुठे गेलं हे शेवटपर्यंत कळण्याचा तुमचा अधिकार हिरावला गेला ते तुमच्या लक्षातच येत नाही. ईव्हीएमला मतदान करताना तुम्ही बटण दाबल्यानंतर आवाज येतो, दिवा पेटतो, पण आतमध्ये मत रजिस्टर्ड खरं कसं झालंय हे कसं कळणार… कुठे झालं हे नाही कळत आपल्याला जे बॅलेट पेपरला कळत होतं. म्हणून ही जी पैशांनी विकत घेतलेली लोकशाही आहे ना ती लोकशाही नाहीच… ही थैलीशाही आहे. थैलीशाही म्हणा हिला.

पण ही थैलीशाही काँग्रेसच्या राज्यातसुद्धा होती…

त्याच्याच तर विरोधात आपण सत्तेवर आलो ना.

या थैलीशाहीवर आपण प्रहार केले आहेत, शिवसेनाप्रमुखांनी प्रहार केले आहेत. काँग्रेसची लोकशाही ही थैलीशाही होती. तीच थैलीशाही तुम्ही आता परत पाहात असाल… तर बदललं काय?

बदललं ना… आम्ही ज्यांच्यावर टीका करत होतो ती माणसं बदलली…

पण लोकांचं भाग्य बदललं नाही ना…

ते भाग्य बदलण्यासाठीच तर आम्ही त्यांची बाजू घेतली होती… म्हणजे आताच्या राज्यकर्त्यांची. तेथेही लोक अभागी ठरले.

 

(क्रमशः)