जनतेच्या आशीर्वादाने सरकार आले तर अगोदर शेतकरी कर्जमुक्त करणार! उद्धव ठाकरे यांचा शब्द

1303

पीकविमा नाही, कर्जमाफी नाही… आता हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. पण तुमच्या आत्महत्येने प्रश्न सुटणार आहे का? आणि कशासाठी जीव द्यायचा? संकट कितीही गंभीर असो, काळजी करू नका… शिवसेना तुमच्यासोबत आहे. जनतेच्या आशीर्वादाने सरकार आले तर सर्वात अगोदर शेतकरी कर्जमुक्त करणार, त्याचा सातबारा कोरा करणार म्हणजे करणारच! असा आश्वासक शब्दच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला. ओल्या दुष्काळामुळे खरीप हातचा गेला आहे. रब्बीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्याच्या खात्यात तत्काळ 25 हजार रुपये जमा करण्यात यावेत, अशी जोरदार मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला खरिपाचा घास परतीच्या पावसाने हिरावून नेला. खायला अन्न नाही, जनावरांना चारा नाही. रब्बीचा हंगाम तोंडावर आहे पण दलदल झालेल्या शिवाराची मशागत कशी करायची अशा गंभीर संकटात राज्यातील बळीराजा सापडला आहे. पीकविमा मिळत नाही, कर्जमाफीचा खडकूही पदरी पडला नाही. बँकांनी वसुलीसाठी सावकारी चालू केली आहे. चोहोबाजूने कोंडी झालेल्या बळीराजाला दिलासा देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मराठवाडय़ातील नांदेड, परभणी, लातूर तसेच बीड जिल्हय़ाचा दौरा केला.

उद्धव ठाकरे यांनी नांदेडमधील जानापुरी, सोनखेड, आंबेसांगवी, किरोडा, गुलाबवाडी, घोडज, माळाकोळी या गावांमधील नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली. विठ्ठल माने, किशन वाघ, उद्धव जाधव, सुभाष जाधव, व्यंकट लाडेकर, भीमराव कांबळे, रमेश कांबळे, तुकाराम कांबळे, तुकाराम लाडेकर आदी शेतकऱ्यांनी त्यांना आपली व्यथा सांगितली. रब्बीच्या तयारीसाठी शेतकऱ्यांना पैशांची नितांत गरज आहे. त्यामुळे कागदी घोडे न नाचवता शेतकऱ्याच्या खात्यात तात्काळ 25 हजार रुपये जमा करण्यात यावेत, याचा पुनरूच्चार यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगाव व इसाद, अहमदपूर येथील खंडाळी, बीडमधील परळी, माजलगाव येथील शेतकऱ्यांचीही भेट घेऊन उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. मराठवाडय़ातील दौऱ्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर, शिवसेना सचिव अनिल देसाई, मिलिंद नार्वेकर, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार बालाजी कल्याणकर, डॉ. राहुल पाटील, संतोष बांगर, लोकसभा संघटक डॉ. मनोज भंडारी, संपर्कप्रमुख संजय मोरे, जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे आणि संतोष सोमवंशी, जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व जी. श्रीकांत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन

गंगाखेड येथून माजलगावकडे जात असताना उद्धव ठाकरे यांनी परळी येथे गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले. उद्धव ठाकरे येणार याची माहिती मिळाल्यानंतर मुंडे यांच्या समाधीस्थळावर फुलांची सजावट करण्यात आली होती. शिवसेना-भाजपा युतीमध्ये मुंडे यांची महत्वाची भूमिका होती.  त्याची आठवण म्हणून समाधीस्थळावर धनुष्यबाण आणि कमळाची पुष्पसजावट करण्यात आली होती.

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी बांधावर जा, शिवसैनिकांना आदेश

नुकसान झालेल्या शेतशिवारांची पाहणी करण्यासाठी आलेल्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. ‘साहेब, यातून मार्ग काढा, आम्हाला वाचवा’ असे आर्जव त्यांनी केले. त्यावर गावागावांत शेतकऱ्यांसाठी मदत केंद्रे सुरू करा आणि पंचनामे करून घेण्यासाठी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करा, असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.

साहेब, कर्जमाफीने फसवले

‘साहेब, कर्जमाफी झालेला शेतकरी म्हणून पालकमंत्र्यांनी माझा सत्कार केला. पण खडकूही पदरी पडला नाही’, अशी व्यथा अहमदपूर तालुक्यामधील शेतकरी सदाशिव राम कुलगरले या शेतकऱ्याने मांडताच उद्धव ठाकरे यांच्यासह सारेच जण अवाक् झाले. उद्धव ठाकरे यांनी तालुक्यातील सुनेगाव सांगवी, उजना तसेच खंडाळी येथील शेतशिवारांच्या नासाडीची पाहणी केली.

…अन् उद्धव ठाकरे गहिवरले

परतीच्या  पावसाने शेतकऱ्यांवर संकटाचे आभाळ फाटले. जेमतेम पडलेल्या पावसावर सोयाबीनचे पीक फोफावले. परंतु कापणीला आलेले पीक परतीच्या पावसाने पार धुऊन नेले. किरोडा गावातील एका शेतकऱ्याने आपले दुःख मांडताना हंबरडाच फोडला.  हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने त्या शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. त्याचा टाहो ऐकून क्षणभर उद्धव ठाकरे निःशब्द झाले. त्याच्या खांद्यावर हात ठेवून कातर स्वरात ते म्हणाले, ‘खचू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.’

आपली प्रतिक्रिया द्या