
हिंदुस्थानच्या राज्यघटनेचे शिल्पकार महामानव ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी आज मुंबई-महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱयातून लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर आलेल्या भीम अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या पुतळय़ाला पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते.
महापरिनिर्वाणदिनी उद्धव ठाकरे प्रतिवर्षी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. आंबेडकरांना अभिवादन करतात. या वर्षी देखील उद्धव ठाकरे यांनी सकाळी पावणेअकराच्या सुमारास दादर येथील चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या पुतळय़ाला अभिवादन केले. यावेळी सुरू असलेल्या बुद्धवंदना गीतामुळे बाबासाहेबांच्या कार्याला अनोखी आदरांजली ठरली. उद्धव ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेबांना आदरांजली वाहिल्यानंतर भीमज्योतीलाही अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीकडून उद्धव ठाकरे यांचे यावेळी स्वागत करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी समन्वय समितीच्या पदाधिकाऱयांशी संवाद साधला. समन्वय समितीच्या वतीने यावेळी उद्धव ठाकरे यांना संविधानाची प्रत भेट देण्यात आली. यावेळी शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, उपनेते मिलिंद वैद्य, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख आमदार महेश सावंत उपस्थित होते.
तैलचित्रातून उलगडला डॉ. आंबेडकरांचा जीवनपट
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे पालिकेच्या वतीने आयोजित डॉ. आंबेडकरांच्या जीवनपटावर आधारित तैलचित्र प्रदर्शनालाही त्यांनी भेट दिली. बाबासाहेबांची तैलचित्रे त्यांनी अगदी जवळून न्याहाळली. डॉ. बाबासाहेबांचा संपूर्ण जीवनपट एकाच ठिकाणी पाहता आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी बाबासाहेबांनी देशासाठी केलेल्या अतुलनीय कार्याच्या आठवणी जागवल्या.

























































