
पंतप्रधान असो वा मुख्यमंत्री, ही सातत्याने येणारी-जाणारी पदे आहेत. पण देशात सध्या हुकूमशाहीचा जो पायंडा पडतोय तो घातक आहे. या हुकूमशाहीविरुद्ध लोकशाहीप्रेमी पक्षांची मजबूत आघाडी निर्माण झाली आहे. तिचे नाव ‘इंडिया’ आहे. आमचा लढा पक्ष किंवा व्यक्तीविरुद्ध नाही तर हुकूमशाहीविरुद्ध आहे, असे खणखणीत उद्गार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज काढले.
उद्धव ठाकरे आज विधान भवनात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना मंगळवारी बंगळुरू येथे झालेल्या भाजपविरोधी पक्षांच्या बैठकीबाबत विचारले. त्यावर ही आघाडी हुकूमशाहीविरुद्ध लढा देईल, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी विधान भवनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार आदित्य ठाकरे हेसुद्धा होते. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधान परिषदेच्या कामकाजातही भाग घेतला.
मी किळसवाणे व्हिडीओ बघत नाही
किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओबाबतही पत्रकारांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना विचारले. त्यावर मी किळसवाणे व बीभत्स व्हिडीओ बघत नाही, असे ते म्हणाले. पण महाराष्ट्रातील माता-भगिनींनी त्यावर प्रतिक्रिया दिली असून त्यांच्या भावनांची कदर या सरकारने केली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
हा धृतराष्ट्र नाही… महाराष्ट्र आहे
मिंधे गटाबद्दल माध्यमांनी विचारले असता उद्धव ठाकरे यांनी ‘आता खरे कोण आणि खोटे कोण हे एवढे न कळण्याएवढी महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही. हा डोळे नसलेला धृतराष्ट्र नाही. हा शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे,’ असा टोला लगावला.
अजित पवारांना भेटलो… सत्तेच्या साठमारीत जनतेकडे दुर्लक्ष नको!
अजित पवार यांच्या भेटीबद्दल माध्यमांनी विचारले असता उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवारांच्या स्वभावाची मला कल्पना आहे. राज्यातील जनतेला अजित पवार यांच्याकडून वेळेवर मदत मिळेल अशी अपेक्षा आहे. पुन्हा एकदा राज्याच्या तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आल्या आहेत. सत्तेच्या साठमारीत जनतेकडे, शेतकऱयांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका, असे आपण अजित पवार यांना सांगितले.


























































