जमिनीवरचे प्रकल्प गुजरातकडे आणि हवेतले प्रकल्प महाराष्ट्राकडे येत आहेत, उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरात निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधानांच्या तोंडी महाराष्ट्राचं प्रेम व्यक्त व्हायला लागलं आहे. 2 लाख कोटींचे प्रोजेक्ट जाहीर झाले आहेत. म्हणजे जमिनीवरचे प्रकल्प गुजरातकडे आणि हवेतले प्रकल्प महाराष्ट्राकडे असं आहे, असा सणसणीत टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला. अमृत यात्रा या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

या प्रसंगी उद्धव ठाकरे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. ते म्हणाले की, आज मी खूश आहे कारण ज्या विधानसभा क्षेत्रातून तुम्ही माजी आमदार होतात, आज आपल्यासोबत माजी आणि आजी असे दोन्ही आमदार एकाच व्यासपीठावर आहेत. आपण जी विधायक कामं केली, ती परंपरा आजही कायम आहे आणि पुढेही कायम राहील. मध्येच माहीत नाही का, पण मला दुरावा झाल्यासारखा वाटत होता. विशेषतः उत्तर हिंदुस्थानी आणि शिवसेनेत. काही लोक असे असतात, त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही चांगलं नसेल तर मध्ये मध्ये विखार पसरवत असतात. आता मी बसलो तेव्हा सगळ्यांनी माझ्या प्रकृतीविषयी विचारणा केली. मी म्हणालो की आधी थोडा अशक्तपणा होता पण आता सगळे सोबत आले तेव्हा माझी ताकद वाढली आहे. आज मला राजकीय भाषण द्यायचं नाही. पण काही गोष्टी अशा असतात ज्या सांगितल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आज अंधेरीतील विजयानंतर जेव्हा ऋतुजा ताई, अनिल परब, कार्यकर्ते, पत्रकार आले तेव्हाही मी कालच्याच माझ्या वाक्याचा पुनरुच्चार केला. तयार राहा, मध्यावधी निवडणुका लागू शकतात. मला प्रश्न विचारण्यात आला की, तुम्हाला हा अंदाज कसा आला. तेव्हा मी म्हणालो की हा फक्त अंदाज आहे. मी काही ज्योतिषी नाही. मी राजकारण बघत आलोय, राजकारण करत आलोय. सरळ गोष्ट आहे, जर तुम्ही सहमत असाल तर हो म्हणा किंवा नाही म्हणा, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

गुजराज निवडणुकांवरून निशाणा साधताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रावर जोरदार टीका केली केली. ते म्हणाले की, काल परवाच गुजरात निवडणुका जाहीर झाल्या. जेव्हा तारीख आली तेव्हा मी म्हणालो की, चला महाराष्ट्रातले बाकीचे उद्योग तरी वाचले. नाहीतर, एक जातोय, दुसरा जातोय, तिसरा जातोय, चौथा गेला.. जाऊ द्या, गुजरात कशाला उत्तर प्रदेशमध्ये पण जाऊ द्या, बिहारमध्ये पण जाऊ द्या. पण महाराष्ट्रात जे उद्योग येऊ घातलेत, ते कशाला पळवताय. जेव्हा तारखा जाहीर झाल्या, तेव्हा वाटलं, चला आता तरी उद्योग पळवले जाणार नाहीत. पण, पुढच्याच क्षणी आपल्या पंतप्रधानांनी भाषणात महाराष्ट्राचा उल्लेख केला. गेल्या कित्येक काळापासून मी तरी त्यांना महाराष्ट्राच्या भल्याचं किंवा हिताचं विधान करताना ऐकलेलं नव्हतं. पण, त्यांनी जाहीर केलं दोन लाख कोटींचे उद्योग महाराष्ट्रात येणार, टाळ्या वाजवा. गुजरात निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधानांच्या तोंडी महाराष्ट्राचं प्रेम व्यक्त व्हायला लागलंय. 2 लाख कोटींचे प्रोजेक्ट . म्हणजे जमिनीवरचे प्रकल्प गुजरातकडे आणि हवेतले प्रकल्प महाराष्ट्राकडे. हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांचा जो भ्रमाचा भोपळा आहे तो फुटण्याच्या आधी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात. हा एक अंदाज आहे, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.