मिंधे सरकारची महाराष्ट्रद्रोही व शिवद्रोही ही प्रतिमा अधिकाधिक उघड होत चालली आहे. या सरकारला महाराष्ट्राबद्दल प्रेम नाही. छत्रपतींबद्दल आदर नाही. माजी राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता तेव्हा महाविकास आघाडीने मोर्चा काढूनही केंद्र सरकारने त्यांना राज्यपाल पदावरून हटवले नव्हते. आजही मालवणमधील आघाडीचे आंदोलन अडवण्याचा या शिवद्रोह्यांनी प्रयत्न केला. यांच्या नसानसात शिवद्रोह ठासून भरला आहे. मात्र महाराष्ट्र हा शिवद्रोह कदापि सहन करणार नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या वेळी ठणकावून सांगितले.
महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यातच मालवणच्या राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना सोमवारी घडली. त्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने आज मालवणात मोर्चा काढून राजकोटवर धडक दिली होती. परंतु सरकारकडून आंदोलनाचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला गेला. त्याचा समाचार उद्धव ठाकरे यांनी या वेळी घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रात दिवसागणिक महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. भ्रष्टाचारही वाढतोय. त्यामुळे महाराष्ट्रात एक प्रकारची अस्वस्थता आहे. आजपर्यंत कधीही घडली नव्हती अशी घटना सोमवारी घडली. मालवणच्या राजकोटवरील शिवछत्रपतींचा पुतळा कोसळला. महाफुटीचे सरकार त्याला जबाबदार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
महाफुटीच्या सरकारला डबल इंजिन लावा किंवा ट्रिपल इंजिन लावा, या सरकारच्या भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे आणि कारभाराने किळस आणलाय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. या किळसवाण्या कारभाराचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने ‘महाराष्ट्र बंद’चा पुकारा दिला होता. परंतु कोर्टाच्या माध्यमातून त्याच्यावरही बंदी आणली गेली. आजही महाविकास आघाडीच्या वतीने मालवणच्या राजकोटवर निषेधासाठी मोर्चा काढला गेला. त्या मोर्चामध्येही मोदी-शहांचे दलाल व काही शिवद्रोही रस्ता अडवून बसले, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कोश्यारींची टोपी कधी वाऱ्याने उडाली नव्हती
वाऱ्याचा वेग अधिक असल्याने पुतळा कोसळला असे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सरकारमधील मंत्री सांगत आहेत. त्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. महाराजांचा पुतळा वाऱ्याने पडला असे कारण सांगितले जातेय. ते कारणच मुळात अत्यंत निर्लज्जपणाचा कळस गाठणारे आहे, असे ते म्हणाले. माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचाही दाखला त्यांनी या वेळी दिला. ते म्हणाले की, महामहीम राज्यपाल कोश्यारी समुद्रकिनारी राजभवनवर राहत होते. त्यांनीही शिवरायांचा अवमान केला होता. पण जोरदार वाऱ्याने राज्यपाल कोश्यारींची टोपी उडाली असे माझ्या तरी वाचनात कधी आले नाही, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली.
पुतळा पडलाच कसा?
शिवरायांचा पुतळा पडलाच कसा, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी या वेळी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यावरही निशाणा साधला. केसरकर बोलताहेत – काही वाईट घडले तर त्यातून पुढे काहीतरी चांगले होईल, हे अत्यंत संतापजनक आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मालवणमधील स्मारकाच्या कामात कोटय़वधींचा भ्रष्टाचार
गेल्या लोकसभेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी मालवणच्या राजकोटवर आले होते. नौदल दिन सिंधुदुर्गाच्या साक्षीने साजरा केला गेला याचा अभिमान निश्चितच सर्वांना झाला. परंतु गाजावाजा करून श्रेय घेण्यासाठी घिसाडघाईने पुतळा केला गेला. त्या पुतळ्यातही भ्रष्टाचार झाल्याचे आता उघड होत आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
शिल्पकार कोण होता, कंपनी कोणती होती, त्यात ठाणे कनेक्शन कसे होते, याबद्दलची समोर आलेली माहिती बघितली तर या स्मारकाच्या कामातही कोटय़वधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचे सिद्ध होते, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.
महाविकास आघाडीने बंगालसारखे पोलिसांवर हल्ले केले नाहीत
कोलकाता अत्याचाराच्या मुद्दय़ावरून बंगालमध्ये भाजपा बंद पुकारून रस्त्यावर उतरली आहे, मात्र महाराष्ट्रातील बंदला मनाई करण्यात आली. त्यासंदर्भात बोलताना, कायदा सर्वांना समान असायला हवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मोदींनी सांगितले होते – ‘वन नेशन वन इलेक्शन.’ मग काय महाराष्ट्र नेशनच्या बाहेर आहे का, असा सवालही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस म्हणतात, बदलापूरच्या घटनेवरून महाविकास आघाडीने त्यांचा राजीनामा मागितला. पण बंगालच्या मुख्यमंत्र्यांचा मागत नाहीत. कारण बंगाल सरकार ते प्रकरण हाताळायला सक्षम आहे आणि आम्ही महाराष्ट्रात राहतो बंगालमध्ये नाही, तसेच तिथे भाजपाकडून पोलिसांवर हल्ले होताहेत तसे आम्ही महाराष्ट्रात केलेले नाहीत, असा टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना लगावला. महाराष्ट्रातील बंदला बेकायदेशीर ठरवणारे न्यायालय आता बंगालमधील भाजपावाल्यांवर काय कारवाई करतेय याकडे आमचे लक्ष आहे, असेही ते म्हणाले.
गुन्हा दाखल केलाय, मग गुन्हेगार कोण?
शिवपुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल होऊनही अद्याप आरोपींना अटक झालेली नाही याकडे माध्यमांनी या वेळी लक्ष वेधले. त्यावर गुन्हा दाखल केला याचा अर्थ सरकारला गुन्हा घडला आहे हे मान्य आहे. तरीही अटक झाली नाही, मग गुन्हेगार कोण, असा प्रतिसवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
कोकण जिंकायचा, महाराष्ट्र जिंकायचा म्हणून पंतप्रधान मोदींनी घाईघाईने पुतळ्याचे अनावरण केले. त्यासाठी पुतळा लवकर करण्याची जबरदस्ती शिल्पकारावर करण्यात आली. 24 वर्षांचा तो शिल्पकार. त्याला समुद्रकिनारी पुतळा उभारताना कोणती खबरदारी घ्यायला हवी काय माहीत. तेथील वाऱ्याचा अंदाज घ्यायला पाहिजे. लाटांचा अंदाज घ्यायला पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
कोसळलेल्या पुतळ्याचे फोटो व्हायरल झाल्याने महाराष्ट्राची जगभरात बदनामी झाली असे माध्यमांनी विचारले असता, गुन्हे दडपून टाकले जाताहेत, मते मिळवण्यासाठी घाई केली ते सरकारचे पाप उघड झालेच पाहिजे आणि झालेच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. बदलापूरच्या घटनेचाही धागा त्याला जोडत ते म्हणाले की, कायदा सक्षम आहे, पण कायदा राबवणाऱ्या यंत्रणेवर दबाव येत असेल तर दबाव आणणारे आणि तबावाला बळी पडणारे दोघेही गुन्हेगार आहेत.
शिवद्रोहींचे पाठीराखे दिल्लीत बसलेत
माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही आज राजकोटवर गेले होते, असे या वेळी माध्यमांच्या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरे यांना विचारले. त्यावर सगळ्याच भाजपा कार्यकर्त्यांना ही गोष्ट पटली असे वाटत नाही. पण आघाडीचे आंदोलन रोखायला राजकोटवर गेलेले सर्व शिवद्रोही आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. एकेकांना बघून मारतो, असे राणे म्हणाले. ते सर्व चॅनेलवर आलेय असे सांगतानाच, हे शिवद्रोही इतके मस्तवाल झालेत की आता त्यांनी सर्व भीडभाड सोडलीय आणि त्यांचे पाठीराखे दिल्लीत बसलेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही शरसंधान केले.
नौदल इतके पोकळ आहे का?
मिंधे सरकारने पुतळा दुर्घटनेची जबाबदारी नौदलावर ढकलली आहे. त्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, नौदल इतके पोकळ आहे का? नौदल समुद्राच्या तुफानाशीच खेळत असते. तिथल्या संकटाचा सामना करते आणि देशाला वाचवते. पुतळा कोसळल्याची जबाबदारी नौदलावर टाकून सरकार मोकळे होणार आहे का? नौदलाला कल्पना नव्हती का की किती वेगाने वारे तिथे वाहणार, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. सिंधुदुर्ग किल्ला 300-400 वर्षांपूर्वी महाराजांनी बांधला तो आजही व्यवस्थित आहे. हे तंत्रज्ञान त्या काळातही इतके प्रगत होते मग आता या तंत्रज्ञानाचा कुठे विसर पडलाय का याकडेही उद्धव ठाकरे यांनी लक्ष वेधले.
मिंध्यांच्या कारभाराचा आता किळस येतोय
सरकारचे मंत्री म्हणताहेत, वाईट घडले म्हणजे पुढे चांगले घडणार. म्हणजे पुन्हा एकदा पुतळा उभारण्याचा घाट घालणार, त्यासाठी टेंडर काढणार आणि त्या टेंडरमध्येही घोटाळा करणार. जिथे तिथे हे सरकार खातेय. म्हणून या सरकारच्या कारभाराचा आता किळस यायला लागलाय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.