
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा… याचा प्रत्यय आज महाराष्ट्राला शिवतीर्थावरील निष्ठावंत शिवसैनिकांच्या दसरा मेळाव्यात आला. आकाशातून जलधारा कोसळत असताना देखील शिवसैनिकांनी शिवतीर्थ खच्चून भरले होते. पावसात, चिखलात निष्ठावंत शिवसैनिक पाय रोवून उभा होता.
शिवसैनिक, शिवतीर्थ आणि दसरा मेळावा ही पंरपरा आजही कायम आहे याचा प्रत्यय आज शिवतीर्थावर आला. सूर्यास्ताच्या वेळी हजारोंच्या संख्येने शिवसैनिक, शिवसेना प्रेमी यांची पाऊले शिवतीर्थाकडे धाव घेऊ लागली. पाऊस, वादळ, वाऱ्यांची पर्वा न करता शिवसैनिकांचे जत्थे शिवतीर्थावर दाखल झाले. ‘जय भवानी जय शिवाजी’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला’, ‘उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…’, अशा घोषणांनी शिवतीर्थाचा सारा परिसर दणाणून सोडला होता. भगवे झेंडे, भगव्या पतका, भगवे वस्त्र घालून आलेले शिवसैनिक यामुळे शिवतीर्थावर भगव्या लाटा उसळत असल्यासारखं जणू भासत होतं. जिकडे नजर जाईल तिथे शिवसैनिक दिसत होते.
विराट, अति विराट सभेला मार्गदर्शन करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थावर दाखल झाले. आधी शस्त्र पूजन, महापुरुषांना आदरांजली वाहण्यात आली. ज्वलंत हिंदुत्त्व आणि महाराष्ट्राचा मराठी बाणा कायम राखणारे उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी उभे राहताच शिवसैनिकांच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. उद्धव ठाकरेंच्या तुफानी भाषणाला शिवसैनिक उत्स्फुर्त प्रतिसाद देत होता. केंद्र आणि राज्य सरकारच्या जनतेविरोधी- शेतकरी विरोधी धोरणांना उद्धव ठाकरे यांनी लक्ष्य केलं. पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर त्यांनी हल्लाबोल केला.
एका बाजूला कोसळणारा पाऊस सुरू असताना दुसऱ्या बाजूला व्यासपीठावर उद्धव ठाकरे यांच्या शब्दाशब्दातून मिळणारा ज्वलंत हिंदुत्त्वाचा विचार ऐकण्यासाठी जागा मिळेल तिथे आणि पावसात भिजत कोणताही गोंधळ न घालता शिवसैनिक उभा असल्याचे चित्र शिवतीर्थावर दिसले.
बाळासाहेबांची भगवी शाल पांघरलेल्या गाढवाचं चित्र आज पहिल्यांदा पाहिलं
”घरून येताना मी आजुबाजुला पाहत होते. वाघाचं कातडं पांघरलेल्या लांडग्यांची गोष्ट आपल्याला माहित आहे. पण बाळासाहेबांची भगवी शाल पांघरलेल्या गाढवाचं चित्र आज पहिल्यांदा पाहिलं. गाढवाववर कितीही शाली टाका. गाढव ते गाढवच. अमित शहांच्या जोड्याचं भार वाहणारं हे गाढव. जनता पण त्यांना जोडे मारणार तो दिवस लांब नाही, उद्धव ठाकरे यांनी भाषणाची सुरुवातच अशा प्रकारे तुफान फटकेबाजीने केली. यावेळी जोरदार शिट्या व टाळ्यांचा कडकडाट झाला.
कमळाबाईने जनतेच्या आयुष्याचा चिखल केलाय
आज सगळीकडे चिखल झालाय. त्याचं कारण कमलाबाई आहे. कमलाबाईने तिच्या कारभाराने स्वत:ची कमळं फुलवली पण जनतेच्या आयुष्याचा चिखल केलाय. शेतकऱ्यांच्या आयुष्याचा चिखल केला आहे. शेतकऱ्याची शेतजमीन वाहून गेली आहे. घरादाराचा चिखल झालाय. जो शेतकरी आपल्याला खायला देतोय तो विचारतोय की आम्ही खायचं काय? अशी परिस्थिती यापूर्वी कधी आलेली नव्हती. आजपर्यंत मराठवाडा अवर्षन ग्रस्त होता. आता तिथे अतिवृष्टी झालीय. मी शिवसैनिकांना आवाहन करतोय की हे संकट मोठं आहे. भूकंप झालेला तेव्हा शिवसेनेने एक गाव दत्तक घेतलेलं. आपल्याकडे सरकार नाहीए पण फूल नाही तर फुलाची पाकळी तरी देऊ. हे करायला पाहिजे. आजचे जे मुख्यमंत्री आहेत. माणसं कशी बदलतात बघा. आपलं राज्य असताना ओला दुष्काळ जाहीर करा आता ते मुख्यमंत्री झाल्यावर बोलतात की ओला दुष्काळ ही संज्ञाच नाहीए. खड्ड्यात घाल्या तुमच्या संज्ञा पण शेतकऱ्यांना मदत करा. सगळं निकष बाजूला ठेवा आणि नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार मदत केलीच पाहिजे, मी मुख्यमंत्री असताना कोणतेही निकष न लावता सरसकट कर्जमाफी केली होती. तशी कर्जमुक्ती करा. यांची 2017 ला जाहीर केलेली कर्जमुक्ती जाहीर करा. नियमित कर्जफेड करणाऱ्याला 50 हजार रुपये प्रोत्साहनपर राशी द्यायला सुरुवात केली होती. तेव्हाच गद्दार पळून गेले सुरतला, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
आम्ही फक्त देशप्रेमी, देशद्रोही अशा दोघांनाच ओळखतो
संघाचा दसरा मेळावा झाला. शंभर वर्ष थोडी थोडकी नाही. संघाची शंभर वर्ष पूर्ण होतायत आणि गांधी जयंती देखील आहे. आज एक ज्येष्ट स्वातंत्र्यसेनानी जीजी पारेख यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यांना आपल्या सर्वांकडून आदरांजली वाहतो. अशी लढणारी माणसं कमी झाली आहेत. जो लढेल तो तुरुंगात जाईल. कालच्या अधिवेशनात जनसुरक्षा कायदा आणला. सगळ्यांनी विरोध केला. विरोध केलाच पाहिजे. तो कायदा लागू होता कामा नये. मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या चेल्यांनी त्याची मखलाशी केली.हा कायदा एकट्यासाठी नाही. हा कडवे डाव्यांसाठी आहे. आम्ही कडवे डावे ओळखत नाही. आम्ही देशप्रेमी, देशद्रोही अशा दोघांनाच ओळखतो. लडाखमधील सोनम वांगचूक एक चांगला देशभक्त. या माणसाने अतिशय दुर्गम भागात, हाड मोडणाऱ्या थंडीत आपले जवान नीट नेटके राहावे त्यामुळे सोलार टेक्नॉलॉजीवर त्यांना छावण्या बांधून दिल्या. पाणी मिळावं म्हणून आईस स्तुपाची योजना आली. लडाखच्या न्यायहक्कासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं. उपोषण सुरू होतं. पण सरकार ढुंकून बघायला नाही. त्यामुळे जेनझी लेह लडाखमध्ये रस्त्यावर आले. त्यानंतर मोदीबाबांनी त्यांना रासूकाखाली तुरुंगात टाकलं. जनसुरक्षा कायदा म्हणजे हम करे सो कायदा. तोच तोडून मोडून टाकायचा आहे. जेव्हा वांगचूक मोदींची स्तुती करत होते तेव्हा ते देशद्रोही नव्हते, पण आता त्यांच्यावर पाकिस्तानला जाऊन आलात म्हणून अटक होत असेल तर नवाझ शरीफचा केक गुपचूप जाऊन खाणाऱ्या मोदींना काय म्हणायचं.
मोदींना मणिपूरमधला ‘मणि’ दिसला पण तिथल्या जनतेच्या डोळ्यातील अश्रू नाही दिसला
तीन वर्ष मणिपूर जळतंय, पण आता काल परवा मोदी मणिपूरमध्ये गेले. तिथल्या महिलांच्या अब्रुचे धिंडवडे निघत होते त्यावेळी ना मोदी जायला तयार ना दुसरे व्यापारी जायला तयार. एवढं झाल्यानंतर मोदी जेव्हा गेले तेव्हा आम्हाला वाटलं की मोदी काहीतरी तोडगा काढतील. अत्याचार झालेल्यांच सांत्वन करतील. पण तिथलं त्यांचं भाषण ऐकून हसायचं की रडायचं हे समजत नव्हतं. ते म्हणतात मणिपूरच्या नावातंच ‘मणि’ आहे. मणिपूरमध्ये जाऊन तुम्हाला मणिपूरमधला ‘मणि’ दिसला पण तिथल्या जनतेच्या डोळ्यातील अश्रू नाही दिसला. तिथली जनता रडतेय, तिथली जनता आक्रोश करतेय पण आमचे पंतप्रधान मणिपूरच्या नावातील मणि आहे सांगतायत, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त करत मोदींवर निशाणा साधला.
भाजप म्हणजे अमिबा
भाजप म्हणजे अमिबा झाला. वाटेल तसा वेडा वाकडा पसरतो. जिथे गरज वाटेल तिथे युती करतो. शरीरात गेला की पोट बिघडतो. तसे हे समाजात घुसले की शांती नाहीसी होती. म्हणून मी त्यांना अमिबा म्हणतो
नशीब मुख्यमंत्र्यांच्या यादीत दहावे आले… नाहीतर फडणवीस म्हणून विसावे आले असते
इंडिया टुडेने एक सर्व्हे केलाय. देशातील सर्वात पॉप्युलर मुख्यमंत्री. आपल्यावेळी पहिल्या पाचात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होता. माझं कर्तृत्व नव्हतं. ते महाराष्ट्राच्या जनतेचं कौतुक होतं. दहाव्या स्थानावर आमचे मुख्यमंत्री. नशीब दहावे आले नाहीतर फडणवीस म्हणून विसावे आले असते. सगळी बजबजपुरी करून ठेवली आहे. काय केलंत काय तुम्ही आजपर्यंत. आज एका अधिकाऱ्याला पकडलंय. काही दिवसांपूर्वी वसई विरारच्या अधिकाऱ्याला पकडलंय. अधिकाऱ्यांना अटक होतेय पण जे मंत्री राजरोस बॅगा उघडून बसलेयत त्यांना हात लावायची हिंमत होत नाही. मंत्र्यांच्या नावाने दारूचे परवाने दिले जातायत. आईच्या नावाने, पत्नीच्या नावाने डान्स बार काढले जातायत. पुरावे सादर केले तरी मुख्यमंत्री त्यांना समज देऊन सोडून देतायत. हा तुमचा कारभार, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर टीका केली.
आमचा देश हाच आमचा धर्म ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे
निवडणूक तुम्ही लावाच. जनता वाटच बघतेय. मुंबईच्या रस्त्याची चाळण झाली आहे, अख्खी मुंबई भोगतेय. जरा पाऊस झाला तर मुंबई भरतेय. मेट्रो मोनो सुरू ठेवण्यापेक्षा बोट सेवा सुरू करा. आणि याचे अमित शहा मुंबईत भाजपचा मुख्यमंत्री झालाच पाहिजे असं बोंबलून दिल्लीला परत जातायत. निवडणूका जवळ येतात तसे भाजपवाले पुन्हा हिंदू मुस्लीम करायला लागले आहेत. शिवसेनाप्रमुखांनी सांगितले आहे की धर्म कुणाचाही कोणताही असला तरी राष्ट्र धर्म एकच असला पाहिजे तो म्हणजे हिंदुस्थान. आमचा देश हाच आमचा धर्म ही शिवसेनाप्रमुखांची शिकवण आहे. तुमचं काय हिंदुत्व. जे भाजपवाले आमच्या अंगावर येतायत यांनी मुंबई जिंकली तर खान महापौर होईल. तुम्ही मुंबई जिंकली तर ती अदानीच्या चरणावर समर्पयामी कराल. जानवं घालाल शेंडी ठेवाल आणि म्हणाल अदानीला समर्पयामी. तुम्ही व्यापारी म्हणून मुंबईकडे बघतायय आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतोय, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले.
संघाच्या शंभर वर्षाच्या मेहनतीला विषारी फळं लागली आहेत
आम्हाला जर का हिंदुत्व शिकवायचं प्रयत्न करत असाल तर पहिलं तुमच्या फडक्यावरचं हिरवा काढा मग आमच्या अंगावर या. भागवत साहेब संघाच्या शंभर वर्षाच्या मेहनतीला लागलेली आज ही विषारी फळं लागली आहेत ती बघून तुम्हाला समाधान वाटतंय का. भागवत साहेबांना सांगता येत नसेल आरएसएसचा हेतू ब्रह्मदेवाचा बाप होण्याचा असेल. पण ब्रह्म देव नाही झाला ब्रह्मराक्षस झाला आहे. आमच्या अंगावर हिंदुत्व म्हणून येताना मोहन भागवतांनी हिंदुत्व सोडलं हे बोलण्याची हिंमत आहे का? मोहन भागवत यांनी मशिदीला भेट दिल्यानंतर मुस्लिमाचे सर्वोच्च नेत्याने मोहन भागवत यांचा राष्ट्रपिता म्हणून उल्लेख केला. जा भाजपवाल्यांनो त्यांना विचारा की त्यांनी हिंदुस्थानचे राष्ट्रपिता म्हटले की पाकिस्तानचे राष्ट्रपिता. मोहन भागवत म्हणतात की या देशात जे राहतायत तो प्रत्येक हिंदू आहे. मग हे जे तुमचे चेलचपाटे हिंदू मुस्लीम करतायत. सोफिया कुरेशींना भाजपावाले पाकिस्तानची बहिण बोलले होते. ती सोफिया कुरेशी आमची सर्वांची बहिण आहे. एकीकडे सोफियाला पाकिस्तानची बहिण म्हणता आणि दुसऱ्या बाजूला बिल्किस बानूवर अत्याचार करणाऱ्यांचे स्वागत करताय. त्याच वेळी मोदी सांगतात. मुस्लीम महिलांकडून रक्षाबंधन करून घ्या. मोदी सांगतात की ईदला त्यांच्या घरी जेवण मुस्लीमांकडून यायचं. नक्की तुम्ही हिंदू आहात हा ते तपासून या, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
बाप देशप्रेमाचं नाटक करतो पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतो
देशप्रेम तुम्ही आम्हाला शिकवताय. काल परवाकडे झालेली क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर जो माणूस क्रिकेटच्या मॅचची तुलना युद्धासोबत करतो तो बेशरम आहे. कशाला थोतांड केली तुम्ही ऑपरेशन सिंदूरची. तुम्हीच आम्हाला सांगितलं की धर्म विचारून गोळ्या घातल्या. तुमचं सरकार दहा वर्ष झालं बसलंय. तुमच्या देशात हिंदू सुरक्षित नाही. बाप देशप्रेमाचं नाटक करतो पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतो. एका बाजूला तुमची नासलेली कुजलेली घराणेशाही, तर दुसऱ्या बाजूला आमची ठाकरेंची घराणेशाही याचा मला अभिमान आहे. कशाला घराणेशाहीवर बोलता? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
भाजपचे पगारी मतदार बनणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय हे आपण ठरवायचं
शेतकरी उद्विग्न आहे, रडतोय. एक वाक्य बोलताना तो बोलून गेलाय, ही भाजपची औलाद पगारी मतदार तयार करतेय. आपल्याला आता ठरवायचं आहे की आपण भाजपचे पगारी मतदार बनणार की स्वाभिमानी मतदार व्हायचंय हे आपण ठरवायचं आहे. पंतप्रधान तिथे दिल्लीत बसलेयत. त्यांनी सर्व कामं रद्द करून एक फुल दोन हाफने दिल्लीत जाऊन बसायला हवं होतं. सर्व निकष बाजूला ठेवून आम्हाला भरघोस मदत द्या असं सांगायला हवं होतं. पण केंद्राला प्रस्ताव हवाय. फडणवीस अभ्यास करत बसलेयत. त्यांना माहित आहे की काही दिवसांनी लोकं विसरतील. थोडंस काहीतरी हातावर टेकवलं की निवडणूका पार पाडू. बिहारच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधांनांनी प्रत्येक महिलेच्या खात्यावर दहा दहा हजार टाकले आहेत. मतं विकत घ्यायला तुमच्याकडे पैसे आहेत पण उद्ध्वस्त झालेल्या महाराष्ट्राला द्यायला पैसे नाहीत. गेल्या निवडणूकीत मोदींनी सव्वालाख कोटी जाहीर केले होते. म्हणजे तुमच्याकडे पैसे आहेत. पण महाराष्ट्राला देत नाही महाराष्ट्रावर अन्याय करतायत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
GST नेहरूंनी लावला होता का?
मोदींना प्रत्येक गोष्टीवर महोत्सव करायचे आहेत. बचत महोत्सव. कुणी लावला होता GST, नेहरूंनी लावला होता का? राजेश खन्नाचा एक चित्रपट आठवतो. त्यात राजेश खन्ना मुख्यमंत्री होते. काही हॉटेलवाले त्यांना भेटायला येतात व बोलतात या या गोष्टींची किंमत आम्हाला दुप्पट करायची आहे तर आजुबाजुचे बोलतात असं कसं चालेल, लोकं भडकतील. त्यावर राजेश खन्ना बोलतो की रक्कम तिप्पट करा. मग लोकं आंदोलन करतील माझ्याकडे येतील मग मी त्यांचं ऐकेन व तोडगा काढून रक्कम तिप्पट नको दुप्पट करा असे आदेश देईन त्यामुळे सर्वच खूष होतील. असा यांचा कारभार सुरू आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी मोदींवर निशाणा साधला.
जे केलं नाही त्याचं श्रेय घेतायत भाजपवाले
तुमचा ज्याच्याशी संबंध नाही त्याचं श्रेय काय घेताय. बीडीडी चाळ पुनर्वसन आम्ही केलंय, मी केलंय त्याचं भूमीपूजन; कोस्टल रोड आम्ही केलाय, ते आमचं स्वप्न होतं. आज देखील त्यांनी तेच केलंय. जी गोष्ट आदित्य इतके वर्ष बोलत होता. त्यावेळी नाईट लाईफवरून भाजपवाल्यांनी जसा नंगानाच केला होता. अहो पण आमची नाईटलाईफ तुमच्यासारखी मकाऊवालं नाईटलाईफ नाही. आज त्यांनी आदित्य जो सांगत होता तोच निर्णय घेतला व त्याचं श्रेय घेतलं आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आज मुंबई महापालिका सव्वा दोन लाख तुटीच्या खड्ड्यात चालली आहे. निवडणूका घेणार असं वाटत नाही. कारण लोकप्रितनिधी सभागृहात जातील तेव्हा तीन वर्षा यांनी खाल्लेली मुंबईची तिजोरी समोर आणतील. आम्ही व्हाईट पेपर आणणार, असा इशाराही यावेळी दिला.
राज ठाकरे व मी एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी
आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. जिथे माझ्या मातृभाषेचा घात होत असेल तिथे मी मराठी माणसात फूट पडू देणार नाही. मराठीवर हिंदीची सक्ती होऊ देणार नाही. आमच्यावर सक्ती करायची नाही. प्रांतरचनेप्रमाणे प्रत्येक भाषेला एक एक प्रांत मिळाला. तसा मराठी भाषेला महाराष्ट्र मिळाला. प्रत्येक राज्याला सरकार, राजधानी मिळाली. महाराष्ट्राला मुंबई ही राजधानी मिळाली. ती मुंबई व्यापाऱ्यांच्या खिशात जाणार असेल तर तो खिसा फाडून मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही. मराठीद्वेष्ट्यांना सांगतोय की मराठीला हात लावून बघा, हात जागेवर राहणार नाही. शिवसेनाप्रमुखांनी सांगितलंय की कुणाच्या अंगावर जायचं नाही, कुणी अंगावर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवायचा नाही. आम्हला कुणाचं उणधूणं काढा.यचं नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
नाहीतर टोप्या घातलेल्या तुमच्या फोटोंचे प्रदर्शन मांडेन.
भाजपला इशारा देतोय की आमचं हिंदुत्व काढू नका नाहीतर टोप्या घातलेल्या तुमच्या फोटोंचे प्रदर्शन मांडेन. आम्हाला प्रश्न विचारण्याआधी तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा. कटेंगे तो बटेंगे कधी करायचे आणि राखी कधी बांधायची. एका राज्यात गोवंश हत्याबंदी. दुसरीकडे. महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी आणि शेजारच्या राज्यात जाऊन खाता. ही कुठली पद्धत आहे तुमची. किरेन रिजीजूंनी देखील सांगितलं की ते गोमांस खातात. एकदा काय ते हिंदुत्वाची व्याख्या ठरवा. भाजपला प्रेमाने सांगतोय की नशिबाने संधी मिळाली आहे त्याचं सोन करा, चिखल करू नका, असा इशारा देखील दिला.