
भारतीय जनता पक्षाचे केंद्रात आणि राज्यात पाशवी बहुमतावर आलेले डबल इंजिन सरकार जनतेच्या कल्याणासाठी काहीच काम करत नाही, फक्त धूर सोडतेय, असा जोरदार हल्ला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केला.
‘मातोश्री’ निवासस्थानी आज झालेल्या पक्षप्रवेश सोहळय़ानंतर उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपचा चांगलाच समाचारही घेतला. ‘भाजपाचे सर्व घोटाळे रोजच्या रोज बाहेर येत आहेत, पण देशात सर्वात मोठा घोटाळा भाजपने केला आहे तो म्हणजे संभ्रम घोटाळा. भाजपने भोळय़ाभाबडय़ा जनतेला आपण त्यांचे पैवारी आहोत असे दर्शवून सातत्याने संभ्रमात ठेवले आणि जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला, पण आता भाजप खोटे बोलतेय हे सर्वांच्या लक्षात आले आहे. भाजपच्या राजवटीत जनतेचे होणारे हाल पाहवत नाहीत म्हणूनच हे सर्व कार्यकर्ते शिवसेनेच्या भगव्याखाली आलेत,’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.
यावेळी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मुस्लिम बांधवही मोठय़ा प्रमाणात होते. मुस्लिम बांधवांना शिवसेनेचे हिंदुत्व कळलेय म्हणूनच ते हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या घरी आलेत, असे उद्धव ठाकरे यांनी अभिमानाने सांगतले. हिंदू धर्माचेच रजिस्ट्रेशन नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुठून येणार, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले होते, त्याचाही समाचार उद्धव ठाकरे यांनी घेतला. संघवाले स्वतःच्या सोयीप्रमाणे भूमिका बदलतात, असे ते म्हणाले.




























































