
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आझाद मैदान येथे आंदोलन करणाऱ्या शिक्षकांची भेट घेतली. आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील शिक्षकांचे आंदोलन सुरू आहे. त्या ठिकाणी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
सत्ताधाऱ्यांनी आपल्या माईकचा आवाज बंद केला असेल पण आपला आवाज ते बंद करू शकत नाही. त्यांनी आपला करंट काढला असं त्यांना वाटत असेल पण आपण भाजपला असा करंट देऊ की सत्तेच्या खुर्चीतून ते उखडून पडतील”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
”आज मी इथे वचन द्यायला आलोय की आपलं सरकार असताना आपण या अनुदानाला हो बोललो होतो. आम्ही सगळे मिळून तुमच्या हक्काचं जे काही आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही. आपली संस्कृती आहे पितृदेव भव:, मातृदेव भव, गुरुदेव भव:, पण या सत्ताधाऱ्यांचे गुरू दिल्लीत बसले आहेत. या गुरुंच्या आज्ञा पालन चालू आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.