शिवसेना सोडून इकडेतिकडे गेलेले कार्यकर्ते आता पुन्हा शिवसेनेत येऊ लागले आहेत. राज्यातील वातावरण आता बदललेले आहे. पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येणार नव्हे आणणारच असे जनतेनेच ठरवले आहे. हराम्यांना सत्तेतून घालवायचेय. त्यामुळे आता आराम नाही, असा घणाघात करतानाच शिवसेनेची मशाल आतापासूनच महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केले.
भारतीय जनता पक्षाचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख माजी आमदार राजन तेली, भाजप प्रदेश चिटणीस सुरेश बनकर, अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व सांगोला मतदारसंघाचे माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील, अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह आज मातोश्री निवासस्थानी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे शिवसेनेत स्वागत करताना त्यांना मार्गदर्शनही केले.
मशाल हाती दिलीय, धग दाखवून द्या
दीपक साळुंखे आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटाचे सांगोल्यातील आमदार शहाजी बापू पाटील यांच्यावर निशाणा साधला. सांगोल्याचा आमदार गद्दार झाला; पण सांगोल्यातील जनता शिवसेनेसोबत आहे आणि ती शब्दाला जागेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. आजपासून पूर्ण मतदारसंघात घराघरात शिवसेनेची मशाल पोहोचवली पाहिजे. कारण गद्दार फक्त गद्दार नाहीत तर ते धनुष्यबाण आणि मशाल असा संभ्रम निर्माण करत आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तुमच्या हातात मशाल दिली आहे, ती कशी पेटवायची आणि कोणाकोणाला चटके द्यायचे हे तुम्हालाच ठरवायचे आहे, असे त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले. त्यावर हरामांना, गद्दारांना जाळून टाकू, असे वचन कार्यकर्त्यांनी दिले. दीपक साळुंखे यांना उमेदवारी जाहीर करा असा आग्रह या वेळी कार्यकर्त्यांनी धरला. पण आपण अजून उमेदवारी कुणालाही जाहीर केलेली नाही. मी फक्त एवढं सांगेन की, दीपक आबांच्या हाती मशाल दिलेली आहे. मशालीची धग दाखवून द्या, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जुलूमशाही, हुकूमशाही जाळून टाका
सुरेश बनकर यांच्या पक्षप्रवेशा वेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सिल्लोडसाठी मशाल तुमच्या हाती दिली आहे. गेल्या वेळी शिवसेनेने चूक केली होती, ती चूक सुधारण्यासाठीच तुमच्या हाती मशाल दिली आहे. तेथील जुलूमशाही, हुकूमशाही जाळून टाकण्यासाठी ती मशाल दिली आहे. तुम्हीही ध्येयाने आणि त्वेषाने पेटलेले आहात. तुम्ही सर्व एकत्र आलात तर विजय अशक्य नाही, पण गाफील राहू नका, आजपासून मशाल घराघरात पोहोचवा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सत्तारांना सिल्लोडच्या मातीत गाडायचे आहे, असे या वेळी उपस्थित कार्यकर्ते म्हणाले. सिल्लोडमधून मला शिवसेनेचा आमदार पाहिजे, तसे वचन द्या, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच, ‘उद्धव साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा घोषणांनी ‘मातोश्री’चा परिसर दुमदुमला.
राजन तेली यांच्या पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राजन तेली हे शिवसेनेचेच जुने कार्यकर्ते आहेत. मधल्या काळात त्यांची दिशाभूल झाली होती. आता ते स्वगृही परतले आहेत. शिवसेना सोडून इकडेतिकडे गेलेले कार्यकर्तेही मोठय़ा संख्येने पुन्हा शिवसेनेत येऊ लागले आहेत.
या वेळी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, छत्रपती संभाजीनगरचे संपर्कप्रमुख उपनेते विनोद घोसाळकर, उपनेते व पुणे संपर्कप्रमुख सचिन अहिर, सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे आदी उपस्थित होते.
जागा वाटप अंतिम टप्प्यात
विदर्भातील जागांबाबत काँग्रेसशी मतभेद दिसून येत असल्याचा दावा माध्यमांनी या वेळी केला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, एकापेक्षा जास्त पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवतात तेव्हा जागा वाटपाबाबत खेचाखेची होते. पण ती तुटेपर्यंत ताणायची नाही हे सर्वच पक्षांनी लक्षात ठेवायला हवे. फार काही तंटा बखेडा झालाय असे माझ्या कानावर आलेले नाही. त्यावर नंतर मी भाष्य करेन. येत्या दोन-तीन दिवसांत किंवा उद्याच्या उद्याही जागा वाटपाचा मुद्दा संपू शकतो इतका तो अंतिम टप्प्यात आला आहे.
शिवसेनेपासून कोकणाला कुणीही तोडू शकत नाही
राजन तेलींचा संघर्ष कोकणात कुणाशी आहे हे सर्वांना माहीत आहे असे पत्रकार म्हणाले असता, त्या संघर्षाला अंतिम स्वरुप देण्यासाठी ते शिवसेनेत परतलेत. कोकण आणि शिवसेना एकजीव आहे. शिवसेनेला कोकणापासून व कोकणाला शिवसेनेपासून कुणीही तोडू शकत नाही हे येणारी निवडणूक सिद्ध करेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
दसऱ्यानंतर मी पहिल्यांदा कार्यकर्त्यांसमोर आलो आहे. मधल्या काळात हॉस्पिटलची वारी केली. डॉक्टर म्हणाले, आराम करा. पण आराम करायचा किती? आता आराम नाही. आधी हराम्यांना घालवायचे आहे. – उद्धव ठाकरे