
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे गुरुवारी विधानभवनात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली.
हे वर्ष फार विचित्र गेलं. अतिवृष्टीने मराठवाड्यात हाहाकार माजवला. शेतकऱ्यांची घरं दार बुडाली, विद्यार्थ्याची वह्या पुस्तक वाहून गेली, पिकं सडून गेली. अनेक ठिकाणी जमिनीवरची मातीच वाहून गेली आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी एक भलं मोठं पॅकेज गोंडस असा शब्द देऊन एक रक्कम जाहीर केली. त्या पॅकेजचं पुढे काय झालं, किती पैसे दिले गेले की त्याचं पण ठिबक सिंचन झालं आहे का ते कळायला मार्ग नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
गेल्या महिन्याच्या अखेरीस देशाचे कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी सांगितलं की महाराष्ट्रा कडून आपत्तीग्रस्तांसाठी कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यांनी राज्य सरकारचं बिंग फोडलं त्यानंतर घाईघाईने प्रस्ताव केंद्राकडे पाठवला असं सांगितलं. आता आम्हाला जाणून घ्यायचं आहे की त्या प्रस्तावात काय आहे, किती रकमेचा गेलाय, कुणाला मदत होणार आहे. राज्य सरकारला आपण भाग पाडलं पाहिजे की जर राज्यासाठी हा प्रस्ताव पाठवला असेल तर तो पटलावर ठेवलाच पाहिजे. जनतेचा, शेतकऱ्यांचा हा अधिकार आहे. मायबाप केंद्र सरकार आमच्यावर दया दाखवणार आहे की नाही व व राज्य सरकार ती मदत कशी आणणार हे समजायला हवं. तिथे डबल इंजिन सरकार आहे. फक्त ढकलपंची करणार आहेत की थेट मदत आणणार आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सरकारकडून देण्यात येणाऱ्या या सगळ्या मदती खातं जमा करण्यात अडकल्या आहेत. पिकविम्याची मदतीची थट्टा झाली आहे. एक रुपया सहा रुपया असे चेक आले आहेत. शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या विमा कंपन्यांवर सरकार कारवाई करणार का? या अधिवेशनात सरकारकडून जनतेला उत्तरं मिळाली पाहिजे. प्रश्न विचारले जातात, व्यथा मांडल्या जातात पण नुसती वेळ मारून नेली जाते हा आतापर्यंतचा अनुभव आहे. कारवाई कार्यवाही काय होणार ते समजायला हवे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
बातमी अपडेट होत आहे.



























































