राजकारणाचा चोरबाजार झालाय! उद्धव ठाकरे यांची टीका

‘राजकारणामध्ये सध्या धुमाकूळ घातला जातोय. सगळे चोर दिसत आहेत. कुणी पैसे चोरतंय, कुणी मत चोरतंय, कुणी पक्ष चोरतंय… राजकारणाचा चोरबाजार झालाय आणि या सगळय़ा चोरबाजारामध्ये माणसं दिसेनाशी झाली आहेत,’ अशी घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.

शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी खासदार आणि आमदार दिवंगत केशवराव धोंडगे यांचे पुत्र पुरुषोत्तम धोंडगे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. त्याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी राजकारणातील सद्यस्थितीवर भाष्य करताना महायुती सरकार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सणसणीत चपराक लगावली. मुंबईसह नांदेडमधील पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

बऱयाच दिवसांनी वेधशाळेचा अंदाज खरा ठरला

हवामान खातेही उद्धव ठाकरे यांच्या तावडीतून सुटले नाही. इकडे आलाय, पण आता जाताना व्यवस्थित जा, कारण पावसाने धुमाकूळ घातला आहे, वादळही आहे आणि बऱयाच दिवसांनी वेधशाळेचा अंदाज खरा ठरला आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांसमोरच वेधशाळेला टोमणा लगावला.

माणसाची कदर नाही, कॉण्ट्रक्टरचे खिसे भरताहेत

आपत्तीग्रस्तांना मदत करणाऱा शिवसैनिकांचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी कौतुक केले. नांदेडमधील 11 गावांचे पुनर्वसन न करता सरकारने धरणाचे काम सुरू केले म्हणून तिथे आपत्ती आली, ती नैसर्गिक नसून मानवनिर्मित आहे. त्या गावकऱयांचे तिथे पुनर्वसन योग्य पद्धतीने केले असते तर कोणाला जीव गमवायची वेळ आली नसती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सरकारला माणसाची कदर नाही, माणुसकी तर नाहीच आहे, त्यांना फक्त कॉण्ट्रक्टरचे खिसे कसे भरायचे एवढेच माहिती आहे, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

विमानतळावरच जहाजेही येतील

मुसळधार पावसामुळे नवीन नवीन ठिकाणी पाणी तुंबत आहे. विमानतळावर साचलेल्या पाण्याचे फोटो येत आहेत. आता हे विमानतळ कोणाकडे आहे? त्यामुळे आता बंदर करायची गरज नाही. जहाजे पण तिथेच येतील आणि विमाने पण येतील, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी उद्योगपती अदानींवरही निशाणा साधला.