शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मोजावी लागणार – उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

25-30 वर्षे आपण ज्यांच्यासोबत राहिलो, ते आपले कट्टर शत्रू झाले आहेत. तसेच आपण ज्यांच्यासोबत लढलो, ते काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारस्थापनेवेळी आपल्यासोबत आले. त्यावेळीची परिस्थिती आपल्याला माहिती आहे. सत्तास्थापनेवेळी आपल्यासोबत आलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आजही आपल्यासोबत आहेत. मात्र, आपण ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच दगा दिला, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रूंची किंमत मोजावी लागणार, असा इशाराही त्यांनी दिला.

या महिला आघाडीला मार्गदर्शन करताना आपल्याला शक्ती मिळाल्याचे जाणावत आहे, असे ते म्हणाले. एका बाजूला गद्दारांच्या डोळ्यातील विकत हसू आणि दुसऱ्या बाजूला निष्ठावंत भगिनी आणि शिवसैनिकांच्या डोळ्यातील अश्रू आहेत. यातून आपल्याला मार्ग काढायचा आहे. तो आपण नक्कीच काढणार आहोत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गेली 25-30 वर्षे आपण ज्यांच्यासोबत राहिलो, ते आता आपले कट्टर शत्रू झाले आहेत. तसेच आपण ज्यांच्यासोबत लढलो, ते काँग्रेस, राष्ट्रवादी सरकारस्थापनेवेळी आपल्यासोबत आले. या काळात आपण ज्यांच्यावर पक्षाची धुरा सोपवली होती, त्यांनीच पाठीत वार केला, याची खंत वाटते. ही आपल्यासाठी लाजेची आणि शरमेची बाब आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवू नका, असे सांगत होते, ते आजही आपल्यासोबत आहेत आणि ज्यांच्या भरवरशावर आपण होतो, त्यांनीच दगा दिला. आता शिवसैनिकांना शिवसैनिकांशी लढायचे आहे, असेही ते म्हणाले.

उपमुख्यमंत्र्यांनी काल मुख्यमंत्र्यासमोरील माईक खेचला, पुढे काय खेचतील, माहित नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगवला. काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती, पण रिक्षाला ब्रेक नव्हता, असेही ते म्हणाले.